सतरा गावांतील पथ्यदिव्यांची वीज तोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:26 IST2021-06-29T04:26:20+5:302021-06-29T04:26:20+5:30
पाचगणी : वीजबिल थकल्यामुळे महावितरणने पाचगणी विभागातील तब्बल सतरा गावांमधील पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. वीजवितरणकडून करण्यात आलेल्या कारवाईमुळे ...

सतरा गावांतील पथ्यदिव्यांची वीज तोडली
पाचगणी : वीजबिल थकल्यामुळे महावितरणने पाचगणी विभागातील तब्बल सतरा गावांमधील पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. वीजवितरणकडून करण्यात आलेल्या कारवाईमुळे गावागावांतून संताप व्यक्त केला जात असून, संबंधित गावे अंधारात चाचपडत आहेत.
ग्रामपंचायतींकडे वीजबिलाची रक्कम थकल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार गोडवली, दांडेघर, खिंगर, आंब्रळ, राजपुरी, भिलार, कासवंडसह १७ गावांतील पथदिव्यांचा वीजपुरवठा वीजवितरणने बंद करून ग्रामपंचायतींना मोठा दणका दिला आहे. १७ गावांतील ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांचे सुमारे ४१ लाख ५० हजार वीजबिल थकल्याने वीजवितरणने गावोगावी पथदिव्यांची वीज तोडली आहे. वास्तविक ही वीजबिले शासनाकडून भरली जातात. तसेच ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांकडून दिवाबत्ती कर रीतसर वसूल केला जातो. असे असताना शासनाच्या अन्यायी कारभारामुळे गावोगावी अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. शासनाने ग्रामपंचायतींना विकासकामांच्या निधीतून बिले भरण्याचा अन्यायी आदेश काढल्याने याचा ग्रामीण विकासावर परिणाम होणार आहे. दरम्यान, शासनाने ताबडतोब वीजबिले भरून पथदिवे सुरू करण्याची मागणी विविध गावांमधील सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ करीत आहेत.