कोरेगावच्या माळरानात स्ट्रॉबेरीचे मळे
By Admin | Updated: April 7, 2015 01:30 IST2015-04-06T21:52:16+5:302015-04-07T01:30:34+5:30
शेतकऱ्यांची प्रतिकूल हवामानावर मात : सर्कलवाडी, वाघोली, चौधरवाडी, वाठारस्टेशन, तळिये येथे लागवड

कोरेगावच्या माळरानात स्ट्रॉबेरीचे मळे
संजय कदम - वाठार स्टेशन -- हवामानानुसार पीक परिस्थिती असलेल्या सातारा जिल्ह्यात अलीकडच्या काळात कोणतीही पीक परिस्थिती कोणत्याही भागात पाहायला मिळत आहे. कोरेगाव तालुक्याचा उत्तर विभाग हा कमी पावसाचा दुष्काळी पट्टा असल्याने या भागात कमी पाण्यावरील पिकांचे उत्पादन घेण्यात येते. यामध्ये द्राक्ष, डाळिंब, ऊस ही प्रमुख पिके आहेत; परंतु गेल्या काही वर्षांपासून कोरेगाव तालुक्याच्या दुष्काळी माळरानावर महाबळेश्वरच्या लालचुटूक स्ट्रॉबेरीची शेती फुलू लागली आहे.
सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरी म्हटलं की महाबळेश्वर, पाचगणी याच भागाच नाव घेतलं जात होतं. मात्र, आता कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील सर्कलवाडी, वाघोली, चौधरवाडी, वाठारस्टेशन व तळिये या गावांनाही स्ट्रॉबेरीने भुरळ घातली असून, येथील शेतकरी स्ट्रॉबेरीची शेती फुलवू लागले आहेत.
तळिये शिवारात देऊर येथील बाळासाहेब पिसाळ या शेतकऱ्याने २० गुंठे क्षेत्रात पाच महिन्यांपूर्वी स्ट्रॉबेरीच्या रोपांची लागवड ठिबक सिंचन वर केली. या पिकाबाबत कोणताही अभ्यास माहीती नसताना त्यांनी २० गुंठ्यात उत्तम प्रकारे स्ट्रॉबेरी चे व्यवस्थापन करीत आजअखेर जवळपास ३.५० लाखांचे उत्पादन घेतले आहे. अजून किमान महिनाभर त्यांना या माध्यामातून अंदाजे दीड लाखाचे उत्पन्न मिळेल अशी त्यांना आशा आहे.
चांगल्या नियोजनाचा योग्य मोबदला
स्ट्रॉबेरी या पिकाबाबत कोणतीही माहिती नसताना या पिकाची २० गुंठे क्षेत्रात लागवड केली. पाण्याच्या कमतरतेमुळे ठिबक सिंचन प्रणाली राबवली. सुरुवातीच्या काळात या फळाला दोनशे रुपयांपर्यंत दर मिळाला. आज ७० ते ८० रुपये दर मिळत आहे. योग्य नियोजन केल्यास कोणत्याही हवामानाशिवाय आपल्या भागातही स्ट्रॉबेरी हे पीक शेतकऱ्यांना चांगला नफा मिळू शकेल.
- बाळासाहेब पिसाळ,शेतकरी देऊर.