राज्यमार्गावर रात्री अकरा वाजता रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 13:32 IST2019-12-04T13:31:01+5:302019-12-04T13:32:26+5:30
मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गाच्या कामादरम्यान ठेकेदाराकडून दिशादर्शक फलक लावले नाहीत. त्यामुळे रात्रीच्यावेळी अनेक अपघात होऊ लागल्याने वाहनचालक व ग्रामस्थांकडून रात्री अकराच्या दरम्यान आंदोलन व रास्ता रोको करण्यात आला. यावेळी मायणी पोलिसांनी स्वत: कामाच्या ठिकाणी बॅरिकेट लावून आंदोलनकर्त्यांची समजूत काढल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

राज्यमार्गावर रात्री अकरा वाजता रास्ता रोको
मायणी : मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गाच्या कामादरम्यान ठेकेदाराकडून दिशादर्शक फलक लावले नाहीत. त्यामुळे रात्रीच्यावेळी अनेक अपघात होऊ लागल्याने वाहनचालक व ग्रामस्थांकडून रात्री अकराच्या दरम्यान आंदोलन व रास्ता रोको करण्यात आला. यावेळी मायणी पोलिसांनी स्वत: कामाच्या ठिकाणी बॅरिकेट लावून आंदोलनकर्त्यांची समजूत काढल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गाचे काम मायणीपासून पूर्वेला सुरू आहे. या कामादरम्यान येथील सद्गुरू सरुताई समाधी मंदिराजवळ दोन दिवसांपासून ठेकेदाराने काम सुरू केले आहे. मात्र, या कामादरम्यान दिशादर्शक फलक न लावल्याने या ठिकाणी अनेक अपघात होऊ लागले.
सोमवारी रात्री अकराच्या एकाच ठिकाणी तीन ते चार दुचाकी घसरून अपघात झाले. सोलापूर येथील एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला, त्यानंतर काहीजण किरकोळ जखमी झाले. अपघातस्थळी जमा झालेल्या व मदतीसाठी आलेल्या ग्रामस्थांनी त्याचवेळी रात्री अकराच्या दरम्यान रास्ता रोको व आंदोलन सुरू केले.
आंदोलनाची माहिती पोलीस पाटील प्रशांत कोळी व मायणी पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनरीक्षक शहाजी गोसावी यांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. या घटनास्थळाच्या ठिकाणचे अपघाताचे नेमके कारण कळाल्यानंतर पोलीस पाटील प्रशांत कोळी यांनी मायणीचे सरपंच सचिन गुदगे यांच्याकडून ठेकेदाराचा नंबर घेतला व ठेकेदाराला संपर्क केला.
त्यानंतर रात्री साडेअकराच्या सुमारास ठेकेदारांच्यावतीने काही लोक त्याठिकाणी आले. त्यावेळी पोलीस अधिकारी गोसावी व पोलीस पाटील कोळी यांनी सूचनाफलक व दिशादर्शक फलक लावण्याच्या सूचना दिला. रात्रीच्या वेळी पुन्हा अपघात होऊ नये, यासाठी पोलिसांनी स्वत: या ठिकाणी बॅरिकेट लावले.