राज्यभरात पोलिसांसाठी गृहप्रकल्प उभारणार
By Admin | Updated: July 19, 2014 23:24 IST2014-07-19T22:56:19+5:302014-07-19T23:24:35+5:30
पृथ्वीराज चव्हाण : कऱ्हाडला ‘खाकी’च्या हाती घराची ‘चावी’

राज्यभरात पोलिसांसाठी गृहप्रकल्प उभारणार
कऱ्हाड : ‘पोलिसांना सन्मानाने राहता यावे, त्यांच्या कुटुंबीयांचा विकास व्हावा, यासाठी त्यांच्या घरचे वातावरण चांगले पाहिजे. त्यासाठी कऱ्हाडप्रमाणेच राज्यातील पोलिसांना चांगली घरे देण्याचा आमचा मानस आहे,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
कऱ्हाड येथे महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळातर्फे बांधलेल्या १३७ सदनिकांचे उद्घाटन मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी गृहमंत्री आर. आर. पाटील, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, आमदार आनंदराव पाटील, डॉ. इंद्रजित मोहिते, पोलीस महासंचालक अरूण पटनाईक, विशेष पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार, जिल्हाधिकारी रामास्वामी एन. उपस्थित होते.
मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, ‘महाराष्ट्र पोलीस दलाने कायदा, सुव्यवस्था चांगल्या प्रकारे हाताळल्यानेच राज्याची समृद्धी होण्यास हातभार लागत आहे. कायदा, सुव्यवस्थेसाठी धडपडणाऱ्या पोलिसांना हक्काचं, कामापासून जवळ घर असणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. असे प्रकल्प राबविताना जागा व निधीची अडचण येते, मात्र त्यावर मार्ग काढले जातील. साताऱ्यातील पोलीस वसाहतीचे रूपही लवकरच पालटेल.’
मंत्री पाटील म्हणाले, ‘कऱ्हाडच्या पोलीस सदनिकांचे उद्घाटन करताना समाधान वाटत आहे. त्याचबरोबर राज्यात ८८ हजार पोलीस जवानांचा प्रश्न मार्गी लावायची जबाबदारी आपल्यावर आहे. याची जाणीव तीव्रतेने होत आहे. कऱ्हाडचे पोलीस आता कोंबडीच्या खुराड्यातून बाहेर आलेत, याचा आनंद होत आहे. राज्यात पोलीस भरती प्रक्रिया पारदर्शी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळेच गरिबांची मुले गुणवत्तेच्या जोरावर पोलीस दलात नोकरी करू लागली आहेत. भरती प्रक्रियेत पाच किमी धावताना चार मुलांचा अंत झाला. त्यामुळे यापुढे हे अंतर कमी करू. तरूणांची शारीरिक क्षमता पोलीस दलात आल्यावर वाढविली जाईल.’
मंत्री सतेज पाटील म्हणाले, ‘पोलिसांची वसाहत म्हटलं की वेगळं चित्र डोळ्यासमोर येते. कऱ्हाडच्या सदनिकांनी त्याला छेद दिला आहे. यंदा नव्या घरात त्यांची दिवाळी साजरी होईल.’
अरूण पटनाईक यांचेही यावेळी भाषण झाले. पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी प्रास्ताविक केले. उपविभागीय पोलीस अधिकारी मितेश घट्टे यांनी आभार मानले. यावेळी पोलीस दलातील कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)