कुडाळ : जावली तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असणाऱ्या कुडाळमध्ये सत्तापालट करून जावळीच्या उपसभापतींनी गावाच्या विकासाची भूमिका ठरवून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध विकासकामांना सुरुवात केली आहे. नुकताच या कामांचा कुडाळमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला.
याप्रसंगी जावलीचे उपसभापती सौरभ शिंदे, बाजार समितीचे चेअरमन राजेंद्र शिंदे, प्रतापगड कारखान्याचे संचालक मालोजीराव शिंदे, जितेंद्र शिंदे, संजय शिंदे, कुडाळच्या सरपंच सुरेखा कुंभार, उपसरपंच सोमनाथ कदम, धैर्यशील शिंदे, दिलीप वारागडे, अनिल किर्वे, राहुल ननावरे, महादेव शिंदे, आशिष रासकर, नीलेश पवार तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.
कुडाळ येथील मराठी शाळा ते पुलस्ती मंदिर रस्ता व नागोबा माळ ते खंडोबा मंदिर या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करणे, जिल्हा परिषद शाळेसाठी शौचालय युनिट बांधकाम तसेच कुडाळ येथे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मंजूर झालेल्या कातकरी समाजाच्या लाभार्थींच्या घरकुलाची उभारणी करणे आदी विकासकामांचा मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला.
चौकट :
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विकासाची गंगा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवली जाईल. त्यांना योग्य सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. तसेच कुडाळमध्ये जास्तीत जास्त विकासकामे करून स्मार्ट सिटी बनवण्याचा मनोदय उपसभापती सौरभ शिंदे यांनी व्यक्त केला.
फोटो : २०कुडाळ-कामे
कुडाळ येथे विविध विकासकामांचा प्रारंभ उपसभापती सौरभ शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या वेळी राजेंद्र शिंदे, मालोजीराव शिंदे, जितेंद्र शिंदे, संजय शिंदे, सरपंच सुरेखा कुंभार उपस्थित होत्या. (छाया : विशाल जमदाडे)