हंडाभर पाण्यासाठी तासभर खडा पहारा!
By Admin | Updated: March 16, 2016 23:42 IST2016-03-16T22:12:39+5:302016-03-16T23:42:37+5:30
शिंगाडवाडीत पाणीप्रश्न गंभीर : हातपंपावर पहाटेपासूनच लागतायत रांगा; टँकर सुरू करण्याची मागणी--खोल-खोल पाणी !

हंडाभर पाण्यासाठी तासभर खडा पहारा!
विठ्ठल नलावडे -- कातरखटाव --भीषण दुष्काळात होरपळणाऱ्या खटाव तालुक्यातील शिंगाडवाडी या वस्तीवर विहिरी, बोअर, हातपंपाला पाणी कमी आल्यामुळे येथील महिला व नागरिकांना पाणीटंचाईचे तीव्र चटके सहन करावे लागत आहेत. हंडाभर पाण्यासाठी तासन्तास हातपंपावर थांबावे लागत आहे. या वस्तीवर टँकर सुरू करण्यासाठी प्रस्तावही देण्यात आला आहे. मात्र अद्याप टँकर सुरू नाही. त्यामुळे शिंगाडवाडी ग्रामस्थांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
कातरखटाव ग्रामपंचायतीतील सुमारे ४५० लोकवस्ती असलेली शिंगाडवाडी १९९७ पासून पाणी समस्येच्या विळख्यात अडकलेली आहे. दरवर्षी ऐन उन्हाळयात येथील लोकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. शिंगाडवाडीला पाणीपुरवठा करणारी सामुदायिक विहीर गाळाने भरली असून वर्ष झालं या विहिरीत चार ते पाच बादल्या पाण्याचा मृत साठा राहिलेला आहे.
उन्हाळयाची तीव्रता वाढत चालल्यामुळे शिंगाडवाडी परिसरातील बहुतांश जलस्रोत कोरडे पडत चालले आहेत. लहान-थोरांना भल्या पहाटेपासून हातपंपावर हंडा घेऊन रांगेत उभे रहावे लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी तू-तू मै-मै करावी लागत आहे. किमान ३० ते ४० पंप मारावे तेव्हा कुठे एक कळशी भरत आहे.
माणसापेक्षा जनावरांची वाईट अवस्था दिसून येत आहे. पाणीपातळी खालावल्यामुळे हातपंप जाचत आहेत. सध्या शिंगाडवाडी वस्ती, मुस्लीम वस्ती, मातंग वस्तीला पाणीटंचाई निर्माण झाली असून टँकर सुरू करण्याची गरज आहे. दरवर्षी ऐन उन्हाळयात या भागात पाणीटंचाई पाचवीला पुजली आहे. या भागाला वरदान ठरलेला रंगसिंग पाझर तलाव गेली तीन वर्षे लागोपाठ पाऊस कमी झाल्याने कोरडा पडला आहे. अशा परिस्थितीवर मात करीत शिंगाडवाडी व परिसरातील नागरिक हंडाभर पाण्यासाठी कोसभर पळत आहेत. त्यामुळे ‘आमच्या वाडीत प्रशासनाचा टँकर कधी येणार?, असा सवाल येथील लोकांनी केला आहे.
अन्यथा आंदोलन उभारणार...
पोटापाण्यासाठी रोजंदारीला जायचं म्हणून पहाटे पाच वाजता उठून महिला दोन-दोन हांडे घेऊन रांगा लावत आहेत. अजून किती दिवस शिंगाडवाडीच्या लोकांची प्रशासन परीक्षा पाहणार आहे? प्रशासनाने शिंगाडवाडीतील पाईपलाईनचा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
रात्री बारा वाजता एका हांड्यासाठी हातपंपावर एक तास बसावं लागत आहे. कोणीही एका हांड्यापेक्षा जास्त पाणी भरू देत नाही. रोज हातपंपावर हंडाभर पाण्यासाठी वाद होत आहेत. विहिरीतील खराब पाणी धुण्याला वापरावं लागत आहे. प्रशासनाने तातडीने टँकर सुरू करावा.
- हरिचंद्र शिंगाडे, माजी चेअरमन, कातरखटाव.
टँकर सुरू केला जाईल
प्रशासनाची आम्ही भेट घेतली आहे. त्यांनी आम्हाला लवकरात लवकर शिंगाडवाडीला व कातरखटाव परिसरातील अन्य वाडीवस्तीला टँकर देण्याचे आश्वासन दिले आहे.
- तानाजी बागल, सरपंच, कातरखटाव