‘पुरस्कृत’साठी अडले काकांचे घोडे

By Admin | Updated: September 26, 2014 23:31 IST2014-09-26T22:55:04+5:302014-09-26T23:31:31+5:30

कऱ्हाड दक्षिण : अधिकृत उमेदवारीच घेण्याचा राष्ट्रवादीचा उंडाळकरांना आग्रह

Stacked horses for 'rewarded' | ‘पुरस्कृत’साठी अडले काकांचे घोडे

‘पुरस्कृत’साठी अडले काकांचे घोडे

सातारा : कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे विद्यमान आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांचा पत्ता कट झाल्यानंतर ते कोणत्या पक्षाकडून लढणार याचीच चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीचे राज्य पातळीवरील नेते त्यांच्या संपर्कात असले, तरी काकांनी पुरस्कृत करा म्हणून राष्ट्रवादीकडे इच्छा व्यक्त केली आहे, तर राष्ट्रवादी त्यांना उमेदवारीच घ्यायला सांगत असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयातून देण्यात आली.
सातारा जिल्ह्यातील सर्वात लक्षवेधी लढत कऱ्हाड दक्षिणची ठरणार आहे. काँग्रेसने येथून विद्यमान आ. उंडाळकरांचीच गच्छंती करत पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. परिणामी ‘काका काँग्रेस’च्या समर्थकांनी आपले राजीनामे दिले आहेत. मात्र, कऱ्हाड दक्षिणमधून राष्ट्रवादीकडून इच्छुक अनेक असले तरी काका राष्ट्रवादीचे उमेदवार असल्याच्या चर्चा दिवसभर जिल्ह्यात रंगल्या होत्या. रामराजे नाईक-निंबाळकर त्यांच्या दिवसभर संपर्कात होते. राज्य पातळीवरील अन्य नेतेही त्यांच्यांशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेत होते.

राष्ट्रवादीचे पाचजणांना ‘एबी’ फॉर्म
राष्ट्रवादी काँग्रेसकडून शशिकांत शिंदे, सत्यजितसिंह पाटणकर, शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील आणि बाळासाहेब पाटील यांना ‘एबी’ फॉर्म दिले. सदाशिवराव पोळ यांची उमेदवारी जाहीर झाली असली तरी त्यांचा ‘एबी’ फॉर्म राष्ट्रवादी कार्यालयातून शशिकांत शिंदे यांच्याकडे देण्यात आला होता. मात्र, शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत तो पोळ यांच्यापर्यंत पोहोचला नव्हता. तसेच रामराजेंकडून फलटणच्या नावाचा निरोप न आल्यामुळे तो अर्ज राष्ट्रवादीचे सरचिटणीस राजकुमार पाटील यांच्याकडे ठेवला गेला.

अकस्मात चर्चेत आली नावे...
काँग्रेस-राष्ट्रवादी आणि महायुती तुटल्याचे स्पष्ट झाल्यानंतर साऱ्यांचीच धावपळ उडाली. सर्वांपुढेच उमेदवार कोण, असे प्रश्न निर्माण झाले. सातारा-जावळीतून काँग्रेसकडून रजनी पवार, तर कोरेगावातून विजय कणसे यांची उमेदवारी निश्चित झाली. सातारा-जावळीतून भाजपचा ‘एबी’ फॉर्म दीपक पवार यांना मिळाल्याचे सांगण्यात आले. काही दिवसांपूर्वी ‘स्वाभिमानी’मध्ये गेलेले दिगंबर आगवणे यांचे काँग्रेसकडून नाव निश्चित झाले. पुरुषोत्तम जाधव मुंबईहून भाजपचा ‘एबी’ फॉर्मच घेऊन आले.

Web Title: Stacked horses for 'rewarded'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.