पाचवड-पाचगणी मार्गावर उद्यापासून एसटी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:25 IST2021-06-27T04:25:15+5:302021-06-27T04:25:15+5:30
पाचगणी: लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर एसटीला अत्यावश्यक सेवा म्हणून प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी मिळाली; परंतु अत्यावश्यक सेवा व शहरी भागातील ...

पाचवड-पाचगणी मार्गावर उद्यापासून एसटी सुरू
पाचगणी: लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर एसटीला अत्यावश्यक सेवा म्हणून प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी मिळाली; परंतु अत्यावश्यक सेवा व शहरी भागातील प्रवासी वाहतूक वगळता ग्रामीण भागात एसटी बंदच होती. त्यामुळे प्रवाशांची हेळसांड होत होती. आता मात्र मेढा आगाराने ग्रामीण भागातील लोकांची आर्त हाक ऐकून सोमवारपासून पाचवड-पाचगणी मार्गावरील एसटी प्रवासी वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
लॉकडाऊन नंतर शहरी व अत्यावश्यक सेवा वगळता ग्रामीण भागातील एसटी प्रवासी वाहतूक बंदच होती. त्यामुळे पाचवड-पाचगणी मार्गावरील सेवा बंद असल्याने कामानिमित्त पाचगणीला जाणाऱ्या कामगार वर्गाचे हाल होत होते. त्यानंतर मेढा आगाराने पाचवड-पाचगणी या ग्रामीण मार्गावर एसटी प्रवासी वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, त्याची अंमलबजावणी सोमवारपासून होणार आहे. या होणाऱ्या एसटी सेवेस प्रवासी वर्गाने प्रतिसाद द्यावा, तरच ही प्रवासी वाहतूक लॉकडाऊन काळात सुरळीत राहणार आहे. वाढत्या डिझेलच्या किमतीमुळे मोकळ्या एसटीच्या फेऱ्या होणे सार्वजनिक उपक्रमाला परवडणारे नाही. ‘हात दाखवा गाडी थांबवा..’ हा सुरक्षित एसटी प्रवास सुरळीत चालू हवा असेल तर प्रवाशांनी खासगी वाहनांपेक्षा एसटीला अग्रक्रम दिला पाहिजे.
कोट..
प्रवासी नागरिकांनी खासगी वाहतुकीपेक्षा शासनाच्या सार्वजनिक उपक्रम असलेल्या एसटी प्राध्यान्यक्रम द्यावा म्हणजे ग्रामीण भागातील वाहतूक सुरळीत चालू राहील.
-सागर पांढरपट्टे, मेढा आगार, ता. जावळी.