एसटी बंद; शेकडो विद्यार्थ्यांचे पेपर बुडाले!
By Admin | Updated: April 7, 2015 01:13 IST2015-04-06T23:45:52+5:302015-04-07T01:13:21+5:30
जावळी खोऱ्यात हतबलता : सत्तर गावांतील विद्यार्थ्यांची अनेक मैल पायपीट; शैक्षणिक नुकसानीला जबाबदार कोण?

एसटी बंद; शेकडो विद्यार्थ्यांचे पेपर बुडाले!
बामणोली : साताऱ्याच्या मुख्य बसस्थानकावरून सोमवारी सकाळी सुटणाऱ्या दोन बस अचानक रद्द केल्याने कास परिसरातील प्रवासी व विद्यार्थ्यांना याचा चांगला फटका बसला. एसटी न आल्याने अनेक विद्यार्थ्यांना वार्षिक पेपर देता आले नाहीत. तर गावोगावी जाणारे प्रवासी एसटी आता येईल नंतर येईल म्हणत तासन्तास ताटकळत बसले. राज्य परिवहन महामंडळाच्या या कारभाराचा सर्वांनीच निषेध केला. याबाबत माहिती अशी की, सातारा येथील मध्यवर्ती बसस्थानकातून बामणोली, कास, तापोळा या जावळी खोऱ्यातील गावांसाठी एसटी सुटतात. सातारा बसस्थानकातून सोमवार, दि. ६ रोजी सकाळी साडेसातला सुटणारी वांजळवाडी, घाटाई तसेच सकाळी आठलाच सुटणारी बामणोली, तेटली बसच्या फेऱ्या अचानकपणे रद्द करण्यात आल्या. त्यामुळे ही बस सातारच्या पुढे आलीच नाही. परिणामी यवतेश्वर, सांबरवाडी, अनावळे, जांभळमुरे, आटाळी, पेट्री बंगला, कासाणी, घाटाई, अंधारी येथील विद्यार्थ्यांना वेळेवर बस मिळाली नाही. त्यामुळे त्यांना सोमवारी होणारा वार्षिक परीक्षेचा पेपर देता आला नाही. हे विद्यार्थी बसथांब्यावर थांबून राहिले होते. सकाळी नऊला त्यांना बस मिळाली; पण तोपर्यंत अर्धा पेपर संपला होता. यामुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. बस रद्द झाल्याने प्रवाशांनाही याचा फटका बसला. त्यामुळे विद्यार्थी, पालकांसाह प्रवाशांनी याचा तीव्र शब्दांत निषेध केला. तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीला जबाबदार कोण? असा प्रश्नही केला आहे. दरम्यान, बसबद्दल सातारा येथील राज्य परिवहन महामंडळाच्या नियंत्रण कक्षात दूरध्वनी केला तरी उचलला जात नव्हता. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळ प्रवाशांच्या सोयीसाठी की गैरसोयीसाठी, असा प्रश्न विद्यार्थ्यांसह पालकांना पडला आहे. (वार्ताहर) पेपरचे काय ? बसमुळे काही विद्यार्थी शाळेत गेलेच नाहीत. तर काहीजण उशिरा पोहोचले. उशिरा शाळेत गेले त्यांना पेपर सोडविण्यासाठी कमी वेळ मिळाला. काही विद्यार्थ्यांना आपले गाऱ्हाणे मुख्याध्यापकासमोर मांडावे लागले. ऐन परीक्षेच्या काळात घडलेल्या या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम झाला आहे. सत्तर गावांचा आहे प्रश्न... जावळी व सातारा तालुक्यांतील सुमारे सत्तर गावांना सातारा बसस्थानकातून बस सोडली जाते. ही सत्तर गावे कास, बामणोली, तापोळा परिसरात आहेत. या भागातील प्रवासी संख्याही अधिक आहे. तरीही परिवहन महामंडळ वेळेवर बस सोडण्याबाबत उदासीन आहे. बस वेळेवर सोडण्यासाठी वारंवार सांगूनही संबंधित लक्ष देत नाहीत. त्यामुळे न्याय मागायचा कोणाकडे, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. बामणोली-गोगवेकडे जाणाऱ्या बसच्या फेऱ्या अनेकवेळा रद्द करण्यात येतात. तसेच उशिरानेही बस सोडल्या जातात. काही बस घाटातच बंद पडत असतात. त्यामुळे विद्यार्थी व प्रवाशांचे हाल होत आहेत. यामार्गावर वेळेवर व चांगल्या स्थितीतील बस सोडण्याची गरज आहे. - विजय जाधव, सरपंच उंबरीवाडी, ता. जावळी