एसटी कर्मचाऱ्यांना ना वेळेवर मिळतो पगार ना वैद्यकीय बिलं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:44 IST2021-09-14T04:44:54+5:302021-09-14T04:44:54+5:30
सातारा : राज्य परिवहन महामंडळाच्या कारभाराला कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून घरघरच लागली आहे. उत्पन्न कमी मिळत असल्याने दोन-तीन महिने ...

एसटी कर्मचाऱ्यांना ना वेळेवर मिळतो पगार ना वैद्यकीय बिलं
सातारा : राज्य परिवहन महामंडळाच्या कारभाराला कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून घरघरच लागली आहे. उत्पन्न कमी मिळत असल्याने दोन-तीन महिने पगारच होत नाही. अशातच अनेकांची वैद्यकीय बिले गेल्या वर्षभरापासून रखडली आहेत. त्यामुळे खिशातले पैसे घालून इलाज केलेल्या कर्मचाऱ्यांवरील अडचणी वाढतच आहेत. बिलं कधी मिळतील, याकडे लक्ष लागून राहिले आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागात अकरा आगार, विभागीय कार्यशाळा, विभागीय कार्यालय असे तेरा युनिटमधील हजारो कर्मचारी कर्तव्य बजावत आहेत. यावर हजारो कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांची रोजीरोटी अवलंबून आहे. आजवर सर्व काही सुरळीत सुरू असतानाच मार्च २०२० मध्ये कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य शासनाने सर्वप्रथम सार्वजनिक प्रवासी वाहतूक बंद केली. याचा फटका सर्वाधिक एसटी महामंडळाला बसला. त्यानंतर आजपर्यंत सलग सेवा सुरू झालेलीच नाही. आता कोठे सर्वकाही पूर्वपदावर येत आहे. मात्र म्हणावे असे उत्पन्नच मिळत नसल्याने हजारो कर्मचाऱ्यांचे पगार रखडले आहेत. दोन-तीन महिन्यांचा पगार रखडल्यानंतर राज्य शासनाकडून आर्थिक मदत घ्यावी लागते. त्यानंतर पगार दिला जातो. अशावेळी वैद्यकीय बिलं मिळणंच अवघड झाले आहे. जसजसे पैसे उपलब्ध होतात तसतशी बिले दिली जात आहेत. आतापर्यंत केवळ सातारा आगार आणि विभागीय कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांचे पगार केले आहेत.
चौकट :
वैद्यकीय बिलं वर्षापासून रखडली
सातारा विभागातील कर्मचाऱ्यांचे वेतन गेल्या वर्षभरापासून रखडले आहे. यामध्ये कोरोना बाधितांवर उपचाराचे असल्याने त्यांची रक्कमही मोठी आहे. खासगी रुग्णालयात उपचार घेतलेल्यांनी खिशातले पैसे मोजले आहेत. पगारच तेव्हा झालेला नव्हता. त्यामुळे उसनवारी घेऊन बिलं भागविली होती. आता उसने घेतलेले पैसेही परत करायची राहिली आहेत.
चौकट
राज्य शासनाच्या मदतीनंतर पगार
एसटी कर्मचाऱ्यांना दोन-तीन महिने पगार मिळत नाही. अखेर हे प्रकरण राज्य शासनाकडे गेल्यानंतर शासनाकडून आर्थिक पॅकेज जाहीर केले जाते. त्यानंतर कर्मचाऱ्यांना पगार मिळतो. त्यामुळे पॅकेज कधी जाहीर होईल, याकडेच लक्ष लागलेले असते.
उपचारावरील खर्च आणायचा कोठून
कर्मचाऱ्यांचा पगारच वेळेत मिळत नाही. त्यामुळे वर्षभरापासून वैद्यकीय बिलंही रखडली आहेत. बिलं वेळेत मिळावीत यासाठी संघटनेच्या पातळीवर पाठपुरावा सुरू आहे. जसजसे पैसे उपलब्ध होतील तशी बिले दिली जात आहेत.
- ज्ञानेश्वर ढोणे,
विभागीय सचिव, एसटी कामगार संघटना
चौकट
११ आगार
वाहक :
चालक :
अधिकारी :
कर्मचारी :
सातारा विभागातील अनेक कर्मचारी, त्यांचे नातेवाईक आजारी आहेत. त्यावर त्यांनी हजारो रुपये तर काहींनी लाखो रुपये खर्च केले आहेत. त्यासाठी काही ठिकाणी हातउसने पैसे घेतले आहेत. ज्यांच्याकडून पैसे घेतले आहेत. ते पैसे मागू लागले आहेत. त्यांना तोंड दाखवायलाही अवघड झाले आहे.
- माणिक पाटील, कर्मचारी.