कंग्राळकरांविरुध्दच्या कारवाईला गती

By Admin | Updated: July 28, 2014 23:21 IST2014-07-28T22:29:43+5:302014-07-28T23:21:32+5:30

अवैध उत्खनन :प्रांतांकडून अपिलावर आदेश नाही; तहसीलदार पुढील कार्यवाहीसाठी सज्ज

Speed ​​of action against Kangralkar | कंग्राळकरांविरुध्दच्या कारवाईला गती

कंग्राळकरांविरुध्दच्या कारवाईला गती

सातारा : अवैध मुरूम उत्खननाबाबत तहसीलदारांनी काढलेल्या आदेशानुसार दिलेल्या मुदतीत बिल्डर श्रीधर कंग्राळकर यांनी दंड भरला नाही. कंग्राळकरांनी केलेल्या अपिलाबाबतही प्रांताधिकाऱ्यांनी कुठलाही आदेश काढला नसल्याने तहसीलदार राजेश चव्हाण यांनी पुढील कार्यवाहीला सुरुवात केली आहे. कंग्राळकरांना दंड वसुलीची पहिली नोटीस धाडण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
येथील बांधकाम व्यावसायिक श्रीधर कंग्राळकर यांनी राधिका रस्त्यावरील सि.स.नं.२८३/१अ प्लॉट नं. १ मध्ये उत्खनन केल्याचे उघड झाल्यानंतर महसूल विभागातर्फे पंचनामा करून त्यांना तब्बल २२ लाख ९५ हजार ७०० रुपये दंडाची नोटीस धाडण्यात आली होती. या नोटिसीची मुदत सोमवारी (दि.२८) संपली. कंग्राळकरांनी या मुदतीत हा दंड भरलेला नाही.
तहसीलदारांनी यापूर्वी दिलेल्या आदेशाविरोधात कंग्राळकर यांनी प्रांताधिकाऱ्यांकडे अपील केले आहे. या अपिलाबाबत प्रांताधिकाऱ्यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही. तहसीलदारांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ नुसार कारवाई सुरू केली आहे.
कंग्राळकरांनी झालेला दंड सात दिवसांच्या आत शासकीय तिजोरीत भरावा, अशी सूचना करणारी नोटीस धाडण्यात येणार आहे. मंगळवारी (दि.२९) रोजी ईदनिमित्त शासकीय सुटी असल्याने बुधवारी (दि.३०) कायद्यानुसार पहिली नोटीस बजावण्यात येणार असल्याचे तहसीलदारांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, कंग्राळकरांनी प्रांताधिकाऱ्यांकडे केलेल्या अपिलाच्या अनुषंगाने तक्रारदार व दिशा विकास मंचचे अध्यक्ष सुशांत मोरे यांनी सोमवारी (२८) प्रांताधिकाऱ्यांकडे एक निवेदन सादर केले. ‘या प्रकरणातील अपिलावर सुनावणी घेताना माझे तोंडी व लेखी म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय कोणताही निर्णय अथवा स्थगिती देऊ नये, यासंदर्भात आवश्यक ती लेखी अथवा तोंडी कायदेशीर पुरावा देण्याचा हक्क कायम ठेवून हा अर्ज रेकॉर्डवर ठेवावा व अपिलाचे मला लेखी कळावे,’अशी लेखी विनंती सुशांत मोरे यांनी प्रांताधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, सातारा यांच्याकडे केली आहे. त्यामुळे प्रशासनाने कंग्राळकर यांच्याविरोधातील कारवाईचा फास आवळण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे.
सुशांत मोरे यांनी लेखी निवेदन दिले असून, ‘आपले ठेवायचे झाकून...’, अशी प्रवृत्ती असणाऱ्यांनी खोटे आरोप करू नयेत.’ असा टोला बिल्डरला हाणला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Speed ​​of action against Kangralkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.