‘दक्षिण’च्या मेळाव्यात ‘उत्तर’ची खदखद बाहेर

By Admin | Updated: August 28, 2014 22:20 IST2014-08-28T21:59:59+5:302014-08-28T22:20:39+5:30

राष्ट्रवादी काँग्रेस : यशवंत विकास आघाडीची पाठ, तर लोकशाही आघाडीत फूट

In the 'South' gathering, 'North' is out of reach | ‘दक्षिण’च्या मेळाव्यात ‘उत्तर’ची खदखद बाहेर

‘दक्षिण’च्या मेळाव्यात ‘उत्तर’ची खदखद बाहेर

कऱ्हाड : विधानसभा निवडणुकीत ‘दक्षिणे’त काय भूमिका घ्यायची, यासाठी गाजावाजा करून घेतलेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्याकडे उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव समर्थक नगरसेवकांसह लोकशाही आघाडीच्या काही नगरसेवकांनीही पाठ फिरवली़ दक्षिणचा निर्णय पक्षश्रेष्ठींच्या कोर्टात टाकत उत्तरेतील आरोप-प्रत्यारोपांची खदखद मात्र येथे बाहेर आली़
कऱ्हाड दक्षिण राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा येथील ‘पलाश मल्टिपर्पज हॉल’मध्ये झाला़ उत्तरेचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्यासह कऱ्हाड जनता बँकेचे अध्यक्ष राजेश पाटील, पांडुरंग चव्हाण, नंदकुमार बटाणे आदींची प्रमुख उपस्थिती होती़
‘दक्षिण’च्या या मेळाव्यासाठी राष्ट्रवादीने खूप गाजावाजा केला होता; पण निमंत्रण पत्रिकेवर नाव असणाऱ्या उपनगराध्यक्ष राजेंद्र यादवांसह त्यांच्या सात नगरसेवकांनी मेळाव्याकडे पाठ फिरवली़
यादव समर्थकही मेळाव्याकडे फिरकले नाहीत़ ज्यांच्या उमेदवारीसाठी हा खटाटोप सुरू आहे़ त्या लोकशाही आघाडीचे अध्यक्ष सुभाष पाटील यांच्या आघाडीतील ज्येष्ठ नगरसेवक, माजी नगराध्यक्ष जयवंत पाटील यांच्यासह पाच नगरसेवकही उपस्थित नव्हते. त्यामुळे लोकशाही आघाडीतील फूट आज प्रथमच चव्हाट्यावर आली़
मेळाव्यात अनेक वक्त्यांनी ‘कऱ्हाडसह पंधरा गावांचा दक्षिणेत समावेश झाला आहे़ आपली मोठी ताकद आहे़ सुभाष पाटलांना संधी द्या़ तुम्ही उत्तरेतून ४० हजारांनी निवडून आलात. सुभाष पाटलांना ८० हजारांनी निवडून आणू,’ अशी जोशपूर्ण भाषणे केली़ मात्र बाळासाहेबांनी आपल्या भाषणात ‘थोडा संयम धरा, आघाडीत अजून खटकाखटकी सुरू आहे़ ते मिटू द्या, मग पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील तो आपण घेऊ,’ असे सांगत ठोस निर्णय घेतलाच नाही; पण त्यांनी आपल्या भाषणातून उत्तरच्या राजकारणाची खदखद मात्र बाहेर काढलीच.
यावेळी बोलताना आमदार पाटील आपल्या भाषणात म्हणाले, ‘उत्तर भागात शेतकऱ्यांच्या जमिनी लाटून आलेल्या पैशातून काहींचा स्वाभिमान अकस्मातपणे जागा झाला आहे़ तसेच काहीजण न झालेल्या विकासकामांचा गावोगावी गाड्या घेवून जाऊन डंका पिटू लागले आहेत़ उत्तरेत प्रचाराची पातळी घसरू लागली आहे़ आम्ही काही बोलत नाही याचा अर्थ आम्ही संयमी आहे, असा घेऊ नका गरज पडल्यास आम्ही जशास तसे उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही़’ (प्रतिनिधी)

Web Title: In the 'South' gathering, 'North' is out of reach