दक्षिण दरवाज्याचे रूप खुलले !
By Admin | Updated: December 19, 2015 00:43 IST2015-12-19T00:43:47+5:302015-12-19T00:43:47+5:30
अजिंक्यतारा किल्ला : तब्बल अडीच टनांच्या प्रवेशद्वारासाठी एक महिना काम चालू

दक्षिण दरवाज्याचे रूप खुलले !
सातारा : अनेक पराक्रमाचा साक्षीदार असणाऱ्या ऐतिहासिक ‘अजिंक्यतारा’ किल्ल्यावर शुक्रवारी आणखी एक ऐतिहासिक घटना घडली. किल्ल्याच्या दक्षिण दिशेला असणाऱ्या प्रवेशद्वारावर तब्बल अडीच टन वजनाचा नवा पोलादी दरवाजा झळकला. साताऱ्यातील एका कलाकाराच्या अनोख्या अदाकारीने हा दक्षिण दरवाजा पुरता हरखून गेला.
‘अजिंक्यतारा’ किल्ल्याचा मुख्य दरवाजा पश्चिम दिशेला आहे. मात्र, पूर्वी संकटकाळात शत्रूच्या तावडीतून निसटण्यासाठी दक्षिण दिशेचा दरवाजा वापरला जायचा. मंगळाईदेवी मंदिराच्या जवळून या दक्षिण दरवाजाकडे आजही जाता येते. मात्र, याठिकाणी निसरडी वाट असल्याने ५०० फुटांपेक्षाही जास्त खोल दरी कोसळण्याची शक्यता होती.
रोज सकाळी फिरायला जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना या दक्षिण दरवाज्याची दुर्दशा खटकत होती. एकदा ही बाब सामाजिक कार्यकर्ते डॉ. अविनाश पोळ यांच्या कानावर टाकली. तेव्हा पालिकेच्या काही अधिकारी व पदाधिकाऱ्यांशी बोलून दक्षिण दरवाजाचे रूप पालटविण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी पालिका मुख्याधिकारी अभिजित बापट, शहर अभियंता चिद्रे, तत्कालीन उपनगराध्यक्ष अमोल मोहिते, यांच्यासह अनेकांनी या दरवाजाच्या नक्षीकामाबाबत चर्चा केली.
गोडोलीतील भद्रकाली इंडस्ट्रीजचे विद्याधर कांबळी यांच्याकडे हे काम सोपविण्यात आले. सुमारे २० बाय १० फूट आकाराचा हा दरवाजा पोलादातून बनविण्याचे ठरविण्यात आले. दरवाजाचा ऐतिहासिक बाज कायम राहावा, यासाठी विद्याधर यांनी शनिवार वाड्याचे दरवाजे दोन दिवस न्याहाळले. राजस्थानातील किल्ल्यांच्या दरवाजांचीही त्यांनी बारीकसारीक माहिती घेतली. त्यानंतर या कामाला सुरुवात झाली. तब्बल महिनाभर हा दरवाजा तयार करण्याचे काम सुरु होते. किल्ल्याच्या दक्षिणेला पाऊस जास्त प्रमाणात असल्याने या दरवाजाला विशेष कोटिंगही करण्यात आले.
शुक्रवारी हा दक्षिण दरवाजा सातारकरांना दर्शन देण्यासाठी पूर्णपणे उभा राहिला आहे. विशेष म्हणजे या दरवाजाकडे जाण्यासाठी पायऱ्यांचेही बांधकाम करण्यात आले आहे. त्यामुळे हा दरवाजा पाहण्यासाठी कोणालाही अगदी सहजपणे जाता येणे शक्य झाले आहे.