मांढरगडावर घुमला ‘चांगभलं’चा गजर!
By Admin | Updated: January 5, 2015 23:18 IST2015-01-05T23:15:53+5:302015-01-05T23:18:04+5:30
काळुबाईची यात्रा : कडाक्याची थंडी, दाट धुक्यात तासनतास उभे राहून भाविकांनी घेतले दर्शन

मांढरगडावर घुमला ‘चांगभलं’चा गजर!
मांढरदेव : महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या मांढरदेव येथील श्री काळुबाईच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी सोमवारी गर्दी केली होती. ‘काळुबाईच्या नावानं चांगभलं’च्या गजराने मांढरगड दुमदुमला. शाकंभरी पौर्णिमेचा (पौष पौर्णिमा) दिवस असल्याने असंख्य भाविक गडावर दाखल झाले होते. मात्र, दरवर्षीच्या तुलनेत कडाक्याची थंडी आणि दाट धुके असल्याने भाविकांना दर्शनासाठी रात्रीपासूनच रांगा लावाव्या लागल्या.
शाकंभरी पौर्णिमेच्या मुख्य दिवशी सकाळी सहा वाजता देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हा सत्र न्यायाधीश ए. पी. रघुवंशी व प्रांताधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्या हस्ते देवीची महापूजा करण्यात आली. यावेळी देवीचे पुजारी काळुराम गुरव यांनी पौरोहित्य केले. महापूजेच्या वेळी देवीच्या दारातील प्रथम भाविक पांडुरंग सखाराम खोपडे व त्यांच्या पत्नी रत्नाबाई (रा. नाटंबी, ता. भोर, जि. पुणे, सध्या रा. मुंबई) यांना पूजेचा मान मिळाला. हे भाविक गेल्या सात वर्षांपासून देवीच्या यात्रेला नित्यनेमाने येतात. यावेळी पूजेसाठी तहसीलदार सदाशिव पडदुणे यांच्यासह अनेक मान्यवर, ग्रामस्थ उपस्थित होते.
यात्रा शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी अनेक विभागांचे अधिकारी व कर्मचारी मांढरदेव येथे तळ ठोकून आहेत. भाविकांना दर्शन सुलभ व्हावे म्हणून अडथळ्यांची उभारणी केली आहे. कळसदर्शन मार्ग, छबिना किंवा देव्हारा मार्ग, चरणदर्शन मार्ग या वेगवेगळ्या रांगा असल्यामुळे भाविकांना सुलभ व लवकर दर्शन मिळत होते. काळुबाईचे दर्शन घेऊन भाविक सुखावत होता. देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात येत होते. (वार्ताहर)
विविध विभागांची पथके
आरोग्य विभागाची पथके, रुग्णवाहिका मंदिर परिसरात तैनात करण्यात आली होती. आजारी भाविकाला आरोग्यसेवा उपलब्ध होत होती.
भाविकांना स्वच्छ व शुद्ध पाणी मिळावे यासाठी पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता साठे आणि उपअभियंता एन. एस. पुजारी कर्मचाऱ्यांसमवेत प्रयत्नशील होते.
वीज वितरण कंपनीचे कर्मचारी, अन्न व औषध प्रशासन, पशुवैद्यकीय विभाग, अग्निशमन दल, ग्रामसेवक जी. डी. तळेकर, सरपंच काळूराम ाीरसागर व इतर विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते
मंगळवारी मांढरगडवर भाविकांची गर्दी अधिक होण्याची शक्यता आहे. त्यासाठा प्रशासन सज्ज झाले आहे.
भाविकांसाठी सोयीसुविधा निर्माण करण्यात आलेल्या आहेत.
देवीला गोडा नैवेद्य
मांढरदेवला पशुहत्या करण्यास बंदी आहे. त्यामुळे लोक देवीला गोडा नैवेद्य दाखवत होते. त्यासाठी त्यांनी चुली पेटविल्या होत्या. दर्शन घेऊन माघारी फिरणारे लोक प्रसाद, देवीचे फोटो, गाण्यांच्या सीडी, खाद्यपदार्थ आदींची खरेदी करत होते.
जादा कुमक
यात्रेमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमोल तांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक हुंबरे, पोलीस निरीक्षक रमेश गलांडे, वीस अधिकारी, २५० कर्मचारी, जलद कृती दल तसेच वज्रपथक मांढरदेव येथे तैनात होते. पाल यात्रेत हत्ती बिथरल्यामुळे उडालेली धावपळ या पार्श्वभूमीवर जादा पोलीस कुमक मागविण्यात आली होती.
तीन कारणांनी गर्दी कमी
सोमवार हा मुख्य दिवस झाल्यानंतर लगेच मंगळवार असल्याने गर्दी तीन दिवसांत विभागली गेली.