वाई, महाबळेश्वरमध्ये लवकरच सर्वे : पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:27 IST2021-05-31T04:27:51+5:302021-05-31T04:27:51+5:30
वाई : वाई, पाचगणी व महाबळेश्वर येथील कोरोना परिस्थितीचा व लसीकरणाचा आढावा घेण्यासाठी लवकरच सर्वे केला जाईल. यानंतर टाळेबंदी ...

वाई, महाबळेश्वरमध्ये लवकरच सर्वे : पाटील
वाई : वाई, पाचगणी व महाबळेश्वर येथील कोरोना परिस्थितीचा व लसीकरणाचा आढावा घेण्यासाठी लवकरच सर्वे केला जाईल. यानंतर टाळेबंदी शिथिल करण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करू, अशी ग्वाही आमदार मकरंद पाटील यांनी दिली.
दोन्ही तालुक्यातील व्यापारी संघटनांनी आमदार मकरंद पाटील यांची भेट घेऊन त्यांना टाळेबंदी शिथिल करण्याबाबत निवेदन दिले. यावेळी आ. पाटील बोलत होते. गेल्या मागील दोन महिन्यापासून दोन्ही तालुक्यातील व्यापार, उद्योग, हॉटेल बंद आहेत. त्यामुळे दुकानदार, व्यापारी, हॉटेल व्यवसायिक आर्थिक गर्तेत सापडले आहेत. महाबळेश्वर, पाचगणी, वाई येथील अनेक व्यापाऱ्यांनी लसीकरण केलेले आहे. येथील रुग्णांची संख्याही कमी आहे. त्यामुळे या परिसरातील व्यापार व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी संघटनांनी आ. पाटील यांच्याकडे केली.
यावेळी आ. पाटील म्हणाले, सद्यस्थितील पूर्ण बाजारपेठ खुली करणे शक्य नाही. त्यासाठी पालिकेच्यावतीने शहरातील नागरिकांचा सर्वे केला जाईल. किती नागरिकांनी लस घेतली आहे व किती नागरिकांची लस घेणे बाकी आहे, दोन्ही तालुक्यात कोरोनाची काय स्थिती आहे, हे या सर्वेत स्पष्ट होईल. त्यानंतर निर्णय घेतला जाईल. जास्तीत जास्त नागरिकांनी लस घेतल्यानंतरच व कोरोनाचे संक्रमण कमी झाल्याशिवाव टाळेबंदीचे निर्बंध शिथिल करता येणार नाही.