वणव्याची धग टाकतेय जलसंधारणाच्या कामांवर माती॒

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:38 IST2021-04-06T04:38:51+5:302021-04-06T04:38:51+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : गावांमध्ये जलसंधारणाची कामं मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. वणवा लागल्यानंतर जमीन पोकळ होते. वळीवाचा पाऊसही ...

Soil on water conservation works | वणव्याची धग टाकतेय जलसंधारणाच्या कामांवर माती॒

वणव्याची धग टाकतेय जलसंधारणाच्या कामांवर माती॒

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : गावांमध्ये जलसंधारणाची कामं मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. वणवा लागल्यानंतर जमीन पोकळ होते. वळीवाचा पाऊसही जमीन अधिक नाजूक करतो. परिणामी मान्सूनच्या पावसात जमिनीचा उत्पादक थर जलस्त्रोतांमध्ये वाहून जातो. ज्या गावांमध्ये जलसंधारणाची कामे झालेली आहेत, तिथंही वाहून आणलेल्या मातीने बांध-बंधारे भरून जातात. त्यामुळे बंधाऱ्यांची पाणीधारण क्षमता हळूहळू कमी होत नष्ट होते. केलेले कामही मातीमोल होते. त्यामुळे गावच्या हद्दीत वणवा लागू न देण्याच्या निकषाचा समावेश पुरस्कारांमध्ये करावा. जेणेकरुन स्थानिक पातळीवरच वणवा लावणाऱ्यांना प्रतिबंध बसेल, अशी अपेक्षा वन्यप्रेमी आणि नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

सातारा जिल्ह्यात कोरोनाच्या साखळीसह वणव्याची साखळीही खंडित करणे प्रशासनापुढे आव्हान बनले आहे. गेल्या दीड महिन्यांत तब्बल १५० हून अधिक ठिकाणी वणवे लागून अनमोल वनसंपत्ती नष्ट झाली आहे. वणवे विझवण्यासाठी वनविभाग प्रयत्न करते, पण वणवा लागूच नये यावर जोर दिला तर ही वनसंपदा वाचवता येऊ शकेल, असा आशावाद पर्यावरणप्रेमींना आहे. गावांना मिळणाऱ्या पुरस्कारांमध्ये वणवामुक्तीसाठी काही गुण निर्धारित करण्यात आले तर गावपातळीवर वणवा रोखणं अधिक सोपं जाईल. जिल्ह्यात सुमारे १४०० चौरस किलोमीटर वनक्षेत्र आहे. शिवाय डोंगरी भाग मोठ्या प्रमाणात आहे. फेब्रुवारीच्या मध्यावर या डोंगरांवर सायंकाळच्या वेळी वणवे दिसू लागतात. एका अहवालानुसार, जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यांत १५० हून अधिक ठिकाणी वणवा लावण्याचे प्रकार घडले. खासगी मालकी क्षेत्रात लावलेला वणवा पुढे तोच वनक्षेत्रापर्यंत पोहोचतो. त्यामुळे हे वणवे विझवण्यासाठी वनकर्मचाऱ्यांना धावाधाव करावी लागते.

वणवा कोण लावतो, याचा गावपातळीवर स्थानिकांना अंदाज असतो. वनविभागाने अशा लोकांना बोलावून त्यांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केल्यास मोठ्या प्रमाणात अशा अघोरी प्रकारांना आळा बसू शकेल. शेतकरी या दिवसात बांध पेटवून निघून जातात. हीच आग वनक्षेत्रात पसरते. त्यामुळे शेतकऱ्यांनी बांध पेटवताना तो विझेपर्यंत काळजी घेतल्यास वणव्याला आळा बसू शकेल. वणव्याच्या धगीमुळे वन्यजीव सैरभैर होऊन ते चुकून मानवी वस्तीत येतात. त्यातून मानव-वन्यजीव संघर्षाचा धोका वाढतो.

चौकट :

वणव्याची जबाबदारी गावाकडे द्यावी

गावात कोण वणवा लावतो, याची माहिती स्थनिक पातळीवर पोलीस पाटील किंवा तत्सम यंत्रणेला असते. ग्रामस्वच्छता अभियानासारख्या लोकसहभागाच्या स्पर्धांमध्ये स्वच्छता, वैयक्तिक शौचालय, कुऱ्हाडबंदी याबरोबरच गावच्या हद्दीत वणवा लागू न देण्याच्या निकषाचा समावेश करावा. जेणेकरुन स्थानिक पातळीवरच वणवा लावणाऱ्यांना प्रतिबंध बसेल तसेच एखाद्याने आगाऊपणा केल्यास त्यांना शोधून केसेस दाखल करणे सोयीचे होईल.

कोट :

बऱ्याच वेळा वनक्षेत्रापासून एक-दीड किलोमीटरवर वणवा लावला जातो. वनक्षेत्रात तो येऊ नये म्हणून, कर्मचाऱ्यामार्फत विझवलाही जातो. मात्र वणवा लावल्याचे ठिकाण अज्ञात राहिल्याने तपासाला थोडा वेळ लागतो. यंत्रणेला याची माहिती मिळून तिथे यंत्रणा राबेपर्यंत वणव्याची धग वाढलेली असते. परिणामी वनक्षेत्राची अपरिमित हानी होते.

- शीतल राठोड, वनक्षेत्रपाल, सातारा

गावांमध्ये जलसंधारणाचे काम सुरू असताना बंधारा बांधण्यासाठी स्थानिकांनी वेळ आणि श्रम खर्ची घातलेले असतात. वणव्यामुळे हे कष्ट वाया जातात. स्‍थानिक पातळीवरच पुरस्कारांच्या निकषात वणवामुक्तीसाठी काही गुण गावांना मिळाले तर वणवामुक्ती शक्य होईल.

- सुनील भोईटे, मानद वन्यजीवरक्षक, सातारा

Web Title: Soil on water conservation works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.