म्हणे अंगण स्वच्छ करण्यासाठी फाशीच्या वडाची कत्तल !

By Admin | Updated: July 29, 2016 23:25 IST2016-07-29T22:45:34+5:302016-07-29T23:25:48+5:30

दोघांवर गुन्हा दाखल : अख्ख्या झाडावर घाव घातला

The slaughter of the hanging wagon for cleaning the courtyard! | म्हणे अंगण स्वच्छ करण्यासाठी फाशीच्या वडाची कत्तल !

म्हणे अंगण स्वच्छ करण्यासाठी फाशीच्या वडाची कत्तल !

सातारा : म्हणे वडाच्या झाडामुळे अंगणात सातत्याने कचरा होत आहे. तसेच भविष्यात झाडाच्या मुळ्याही घरात येऊ शकतात. त्यामुळे एका व्यक्तीने या ऐतिहासिक फाशीच्या वडाची कत्तल केल्याचे समोर आले आहे. एवढेच नव्हे तर वडाची फांदी तारेला चिकटत असल्याचे कारण पुढे करत संबंधिताने अख्ख्या वडाच्या झाडावरच घाव घातला. त्यामुळे इतिहासप्रेमी संतप्त झाले आहेत. दरम्यान, याप्रकरणी दोघांवर गुन्हा नोंद झाला आहे.
ज्या व्यक्तीने या ऐतिहासिक फाशीच्या वडाची कत्तल केली. त्या व्यक्तीचे घर वडापासून साधरण ३० ते ४० फूट अंतरावर आहे. असे असताना त्या व्यक्तीने घरासमोर असलेल्या विजेच्या तारेला वडाच्या झाडाची फांदी लागत असल्याचे कारण पुढे केले. यावर पालिकेच्या एका कर्मचाऱ्याने असा प्रकार होत असेल तर एकच फांदी तोडा, असे त्या व्यक्तीला सांगितले. मात्र, हा तोंडी आदेश बासनात गुंडाळून संबंधिताने ऐतिहासिक फाशीच्या वडाची अक्षरश: खांडोळी के ली. हा सारा प्रकार उघड झाल्यानंतर इतिहासप्रेमी आणि सातारकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. काहींनी थेट पालिकेत जाऊन यासंदर्भात जाब विचारला. त्यावेळी अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. वास्तविक वडाचे झाड तोडण्याची परवानगी पालिकेला नसते. असे असताना त्या कर्मचाऱ्याने कोणत्या अधिकाराद्वारे फाशीचा वड तोडण्याचा संबंधिताला आदेश दिला. हे इतिहासप्रेमींना समजेनासे झाले आहे. इतिहासप्रेमींनी याबाबत तक्रार केल्यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू केली. चौकशीत तत्य आढळल्यास कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार आहे.
एकीकडे ऐतिहासिक ठेवा जिवापाड जपला जातो. मात्र, साताऱ्यामध्ये त्याला हरताळ फासला जात आहे. प्रशासनानेही संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी आता सातारकरांमधून होत आहे. (प्रतिनिधी)


काय आहे फाशीच्या वडाचा इतिहास !
१८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामात अनेक क्रांतिकारकांनी सहभाग घेतला होता. काही क्रांतिकारकांना साताऱ्यातील गेंडामाळावर वडाच्या झाडाला फाशी दिली गेली होती. जनतेमध्ये दहशत पसरावी, यासाठीच ही फाशी देण्यात आली होती. त्याच ऐतिहासिक स्थळ असणाऱ्या गेंडामाळावरील वडाची निर्घृणपणे कत्तल करण्यात आली आहे. त्यामुळे स्वातंत्र्य संग्रामातील ऐतिहासिक ठेवा आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.


गुन्हा दाखल...
ऐतिहासिक फाशीचा वड तोडल्याच्या आरोपावरून शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. धनंजय इनामदार आणि नीलेश इनामदार (रा. शाहूपुरी, सातारा) अशी त्यांची नावे आहेत. ‘लोकमत’ व इतिहासप्रेमींनी यासंदर्भात आवाज उठविल्यानंतर पोलिसांनी याची तत्काळ दखल घेऊन संबंधितावर गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: The slaughter of the hanging wagon for cleaning the courtyard!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.