सत्ताधाऱ्यांविरोधातील उद्रेक मतदानातून दाखवून द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:25 IST2021-06-27T04:25:22+5:302021-06-27T04:25:22+5:30
कऱ्हाड : ‘सुमारे साडेआठ हजार सभासदांना सत्ताधारी मंडळींनी ताटकळत ठेवले आहे. सभासद, कामगारांना हीन दर्जाची वागणूक देत आपला स्वार्थ ...

सत्ताधाऱ्यांविरोधातील उद्रेक मतदानातून दाखवून द्या
कऱ्हाड : ‘सुमारे साडेआठ हजार सभासदांना सत्ताधारी मंडळींनी ताटकळत ठेवले आहे. सभासद, कामगारांना हीन दर्जाची वागणूक देत आपला स्वार्थ साधणारी सत्ताधारी मंडळी या निवडणुकीत बाजूला केली पाहिजेत. मी तीन तालुक्यात फिरताना सभासदांमध्ये सत्ताधारी मंडळींवर नाराजी असल्याचे जाणवले. हा उद्रेक निवडणुकीत दाखवून द्या. निवडणुकीच्या माध्यमातून सभासदांवर झालेल्या अन्यायाचा जाब विचारा,’ असे आवाहन सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी केले.
यशवंतराव मोहिते रयत पॅनलच्या प्रचारार्थ शेणोली, गोळेश्वर, कापील, वारूंजी विभागात मंत्री कदम यांनी दौरा केला. यावेळी गोळेश्वर (ता. कऱ्हाड) येथील प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी कऱ्हाड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, नरेंद्र नांगरे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
मंत्री कदम म्हणाले, ‘सत्ताधारी मंडळींनी सुमारे साडेआठ हजार सभासदांना त्यांच्या सभासदत्वाच्या हक्कापासून वंचित ठेवले आहे. त्यांना आपल्याला न्याय द्यायचा आहे. यशवंतराव मोहिते रयत पॅनल हे नि:स्वार्थी, स्वच्छ विचारांच्या लोकांचे आहे. ही लोकं कारखान्याच्या सत्तेवर बसली पाहिजेत. रयतचे उमेदवार आपल्याला न्याय देतील.’
इंद्रजित मोहिते यांचा अभ्यास साखर उद्योगासाठी उपयुक्त ठरत आहे. त्यांनी अध्यक्ष असताना उच्चांकी दर दिला. त्यांच्या काळात सभासदांचे राहणीमान सुधारले. त्यांना पुन्हा संधी देऊया, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले. दौलतराव इंगवले यांनी आभार मानले.
फोटो २६ विश्वजित कदम
गोळेश्वर (ता. कऱ्हाड) येथे आयोजित प्रचार सभेत मंत्री विश्वजित कदम यांनी विरोधकांचा समाचार घेतला. यावेळी सभासद उपस्थित होते.