CoronaVirus Satara Updates : जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा वगळता दुकाने, बाजारपेठ, मॉल्स राहणार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 13:10 IST2021-04-06T13:07:00+5:302021-04-06T13:10:12+5:30
CoronaVirus Satara Updates : कोरोना रुग्णांचे प्रमाण वेगाने वाढत असल्याने राज्य शासनाने निर्बंध लागू केले आहेत. त्याचबरोबर आता जिल्हाधिकाऱ्यांनीही ३० एप्रिलपर्यंत सुधारित निर्बंध लागू केले आहेत. यानुसार जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा वगळता दुकाने, बाजारपेठ, मॉल्स बंद राहणार आहेत. तसेच वाहतुकीबाबतही नियम घालून दिले आहेत. तर जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

CoronaVirus Satara Updates : जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा वगळता दुकाने, बाजारपेठ, मॉल्स राहणार बंद
सातारा : कोरोना रुग्णांचे प्रमाण वेगाने वाढत असल्याने राज्य शासनाने निर्बंध लागू केले आहेत. त्याचबरोबर आता जिल्हाधिकाऱ्यांनीही ३० एप्रिलपर्यंत सुधारित निर्बंध लागू केले आहेत. यानुसार जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा वगळता दुकाने, बाजारपेठ, मॉल्स बंद राहणार आहेत. तसेच वाहतुकीबाबतही नियम घालून दिले आहेत. तर जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आले आहे.
सातारा जिल्हयात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने निर्बंध वाढविणे आवश्यक असल्याने जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी सोमवारी रात्री आठपासून ३० एप्रिलच्या मध्यरात्री १२ पर्यंत निर्बंध लागू केले आहेत. जिल्ह्यात ३० एप्रिलपर्यंत कलम १४४ लागू करण्यात आले आहे. या कालावधीत सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी ५ पेक्षा जास्त लोक एकत्र येण्यास किंवा जमण्यास मनाई करण्यात आली आहे. तर उर्वरित कालावधीत म्हणजे सोमवार ते गुरुवार या दिवशी रात्री ८ ते सकाळी ७ या वेळेत आणि शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ पर्यंत वैध कारणाशिवाय सार्वजनिक ठिकाणी जाण्यास बंदी आहे. असे असलेतरी वैद्यकीय आणि इतर अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली आहे.
त्याचबरोबर सोमवार ते गुरुवारी रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत आणि शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत सर्व उद्याने, सार्वजनिक मैदाने बंद राहणार आहेत. तर सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ या दरम्यान, अशा ठिकाणी सर्व नागरिकांनी कोरोना नियमांचे योग्य व काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. स्थानिक अधिकाऱ्यांवर निरीक्षणाची जबाबदारी आहे. गर्दी झाल्यास व कोरोनाचा प्रसार होऊ शकतो, असे वाटल्यास उद्याने, मैदाने तत्काळ बंद करण्यात येणार आहेत.
अत्यावश्यक सेवेमध्ये यांचा समावेश असेल...
रुग्णालये, निदान केंद्रे, क्लिनिक, वैद्यकीय विमा कार्यालये, फार्मास्युटिकल कंपन्या, इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा. किराणा सामान, भाजीपाला दुकाने, दुग्धशाळा, बेकरी, मिठाई, खाद्य दुकाने. सार्वजनिक परिवहन, ट्रेन, टॅक्सी, आॅटो आणि सार्वजनिक बस. स्थानिक प्राधिकरणाद्वारे देण्यात येणाऱ्या सर्व सार्वजनिक सेवा. वस्तूंची वाहतूक. कृषी संबंधित सेवा. ई कॉमर्स. अधिकृत मीडिया. पेट्रोल पंप. स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे आवश्यक सेवा म्हणून नियुक्त केलेल्या सेवा यांचा अत्यावश्यक सेवात समावेश आहे.
दुकाने सहापर्यंतच सुरू
अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, मार्केट आणि मॉल्स पूर्ण दिवसभर बंद राहतील. अत्यावश्यक सेवा दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू राहतील. अत्यावश्यक सेवा दुकान परिसरातील ग्राहकांमधील सामाजिक अंतर निश्चित असणे आवश्यक आहे. तसेच जास्त ग्राहक आल्यास शक्य तेथे चिन्हांकित करून पुरेसे सामाजिक अंतर राखणे महत्वाचे आहे. अत्यावश्यक दुकानांचे मालक आणि सर्व दुकानात काम करणाऱ्यां व्यक्तींनी लवकर लसीकरण करुन घेणे आवश्यक आहे. तसेच सर्व दुकान मालकांनी पारदर्शक काचेचा किंवा इतर साहित्याच्या वापर करावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
सार्वजनिक वाहतूक:
सार्वजनिक वाहतुकीबाबतही काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. आॅटो रिक्षामध्ये चालक आणि दोन प्रवाशी राहतील. चारचाकीत चालक आणि उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या निर्देशानुसार क्षमतेच्या ५० टक्के लोक. बसमध्ये आसन क्षमतेनुसार प्रवास करणे आवश्यक आहे. पण, बसमध्ये उभे राहून प्रवास करण्यास परवानगी नाही. सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणाºया सर्व व्यक्तींनी मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे. विना मास्क आढळल्यास ५०० रुपये दंड आकारला जाणार आहे.
चारचाकी टॅक्सीमध्ये एखाद्याने मास्क घातला नसल्यास नियम उल्लंघन करणारा प्रवासी आणि चालकाला प्रत्येकी ५०० रुपये दंड भरावा लागणार आहे. तर सर्व वाहने प्रत्येक फेरीनंतर सॅनिटाइझ करणे बंधनकारक आहे. जनतेच्या संपर्कात येणारे वाहनचालक आणि इतर कर्मचाऱ्यांनी लवकर लसीकरण करावे. त्याचबरोबर लसीकरण पूर्णपणे होत नाही तोपर्यंत संबंधितांनी आपल्याबरोबर १५ दिवसांपर्यंत वैध असणारे नकारात्मक कोरोना निकाल प्रमाणपत्र ठेवणे बंधनकारक आहे. हा नियम १० एप्रिलपासून अंमलात येणार आहे. मात्र; टॅक्सी आणि आॅटोसाठी चालक प्लास्टिकच्या शीटद्वारे स्वत:ला अलग ठेवत असल्यास त्याला या अटीतून सूट मिळणार आहे.
कार्यालयांबाबत निर्बंध...
पुढील कार्यालये वगळता सर्व खासगी कार्यालये बंद राहतील. यामध्ये सहकारी, पीएसयू आणि खासगी बँका, चार्टड अकाउंटंट यांची कार्यालये. विद्युत पुरवठा संबंधित कंपन्या आणि कार्यालये. दूरसंचार सेवा देणारी कार्यालये. विमा, मेडिक्लेम कंपन्या. उत्पादन व वितरण व्यवस्थापनासाठी फार्मास्युटिकल कंपनी, कार्यालये सुरू राहतील. सरकारी कार्यालये ५० टक्के उपस्थितीसह कार्यरत राहतील. वीज, पाणी, बँकिंग आणि इतर वित्तीय सेवेशी निगडीत सर्व शासकीय कार्यालये तसेच शासकीय कंपन्या पूर्ण क्षमतेसह सुरू राहतील.
शासकीय कार्यालये तसेच सरकारी कंपन्यांबाबतीत त्याच कार्यालयात असलेल्या कार्यालयातील कर्मचाºयांव्यतिरिक्त कोणाबरोबरही सर्व सभा आॅनलाईनच आयोजित कराव्यात. सरकारी कार्यालये तसेच सरकारी कंपन्यांमध्ये कोणत्याही अभ्यागतांना परवानगी दिली जाणार नाही, याची काळजी घ्यावी. शासकीय कार्यालयातही प्रवेशासाठी ४८ तासांच्या आतील नकारात्मक आरटीपीसीआर अहवाल असणाऱ्या अभ्यागतांनाच अपवादात्मक परिस्थितीमध्य प्रवेश पास द्यावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.