दुकानातील कामगारांना कळकाने चोपले
By Admin | Updated: April 5, 2015 00:01 IST2015-04-04T23:58:46+5:302015-04-05T00:01:11+5:30
चुलता-पुतण्याला अटक : चोरीच्या संशयावरून मायणी येथे घडला प्रकार

दुकानातील कामगारांना कळकाने चोपले
मायणी : चोरी केल्याच्या संशयावरून स्वत:च्याच दुकानातील कामगारांना चुलता आणि पुतण्याने मिळून जबर मारहाण करून जखमी केल्याची घटना मायणी येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी दुकानमालकासह पुतण्याला अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, मायणी येथे मधुकर निवृत्ती घाडगे (रा. निमसोड, ता. खटाव) यांचे रेवणसिद्ध क्लॉथ स्टोअर्स नावाचे कापड विक्रीचे दुकान आहे. त्यांच्याच दुकानात मायणी येथील हणमंत दिनकर काटकर (वय २२) व अमित राजाराम सोमदे (वय १९) हे कामगार म्हणून कामास होते.
घटना घडली त्यादिवशी दुपारी कचऱ्याच्या डब्यात दुकान मालक मधुकर घाडगे यांना दोन साड्या सापडल्या. या साड्या चोरून नेण्याच्या उद्देशाने कामगारांनी डब्यात टाकल्या असाव्यात, असा संशय घेऊन मधुकर घाडगे व त्यांचा पुतण्या सुशांत मुरलीधर घाडगे या दोघांनी दुकानाचे शटर बंद करून कामगारांना माडीवर नेऊन कळकाने मारहाण केली. मारहाण थांबल्यानंतर ते दोघेही जखमी अवस्थेत घरी गेले. तातडीने त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेतल्यानंतर या घटनेची नोंद
मायणी पोलीस ठाण्यात केली. (वार्ताहर)