शिंदेंवरील ‘अविश्वास’ नामंजूर
By Admin | Updated: July 31, 2016 00:03 IST2016-07-31T00:03:05+5:302016-07-31T00:03:05+5:30
जिल्हा परिषद : बालेकिल्ल्यात राष्ट्र्रवादीला काँग्रेसची चपराक

शिंदेंवरील ‘अविश्वास’ नामंजूर
सातारा : सातारा जिल्हा परिषदेचे राष्ट्रवादीचे कृषी सभापती शिवाजीराव शिंदे यांच्यावर राष्ट्रवादीनेच अविश्वास ठराव दाखल केला होता. अविश्वास ठरावासाठी बोलविण्यात आलेल्या विशेष सभेला राष्ट्रवादीचे केवळ ३६ सदस्यच उपस्थित राहिले. तसेच खासदार उदयनराजे समर्थक जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रवी साळुंखे यांच्यासह राष्ट्रवादीचे तीन सदस्य आणि काँग्रेस सर्व सदस्य अनुपस्थित राहिल्याने पीठासन अधिकारी अमृत नाटेकर यांनी कृषी सभापती शिवाजीराव शिंदे यांच्यावर राष्ट्रवादीने दाखल केलेला अविश्वास ठराव नामंजूर केला.
दरम्यान, अविश्वास ठराव नामंजूर झाल्यामुळे बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला कोंडीत पकडून काँग्रेसने मोठी चपराक दिली आहे. अविश्वास ठराव जिंकता न आल्याने राष्ट्रवादीवर नाचक्की ओढावली असून, बालेकिल्ल्यात अस्वस्थता पसरली आहे. यावेळी शिवाजीराव शिंदे आणि काँग्रेस समर्थकांनी जिल्हा परिषदेच्या बाहेर फटाके फोडून आनंद साजरा केला.
सभापतीवर अविश्वास ठराव आणण्याची जिल्हा परिषदेच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. शिंदे हे राष्ट्रवादीचे असले तरी त्यांना आता अविश्वास ठराव जिंकण्यासाठी काँग्रेसच्या कुबड्या घ्यावा लागणार होत्या. शिवाजीराव शिंदे यांना मदत करण्यासाठी काँग्रेसही एकवटली होती. राष्ट्रवादीकडे ४४ एवढे पुरेसे संख्याबळ सभागृहात नसल्यामुळे राष्ट्रवादीला बालेकिल्ल्यात हार मानण्याची नामुष्की ओढावली. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी हा अविश्वास ठराव जिंकण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावली होती, तर दुसरीकडे काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादीला हा अविश्वास ठराव कोणत्याही परिस्थितीत जिंकू द्यायचा नाही यासाठी राष्ट्रवादीचे सभापती शिवाजीराव शिंदे यांच्या पाठीमागे काँग्रेसची ताकद पणाला लावली होती.
रामराजे नाईक-निंबाळकर ठराव जिंकण्यासाठी, तर काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी अविश्वास ठराव कसा नामंजूर होईल, यासाठी रणनीती आखली होती. अखेर राजकीय पटलावरील खेळात आमदार जयकुमार गोरे यशस्वी ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
उदयनराजेंच्या समर्थकांनी व्हीपही धुडकावला !
राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेले खासदार उदयनराजे समर्थक जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रवी साळुंखेसह तीन सदस्य व्हीप बजावूनही अनुपस्थित राहिले, तर काँग्रेसच्या सर्व १८ सदस्यांनी सभागृहात न येता गैरहजर राहणे पसंत केले. सभागृहात ४४ संख्याबळ असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची गोची झाली होती. इकडे आड...अन् तिकडे विहीर, अशी अवस्था झाल्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता पसरली होती. सभागृहात अविश्वास ठरावाच्या बाजूने ३६ सदस्यांनी सह्या केल्या. मात्र, सभागृहाच्या दोन तृतीयांश म्हणजे ४४ सदस्य संख्या नसल्याने राष्ट्रवादीने शिवाजीराव शिंदे यांच्यावर दाखल केलेला अविश्वास ठराव नामंजूर करण्यात आल्याचे पीठासन अधिकारी अमृत नाटेकर यांनी घोषित केले. (प्रतिनिधी)