कराडात शिंदेसेनेची 'तक्रार', अपक्ष उमेदवाराला 'नोटीस'!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 23:25 IST2025-11-25T23:25:30+5:302025-11-25T23:25:38+5:30
घडतंय बिघडतंय : म्हणे,नेत्यांचे फोटो अन् चिन्हाचा गैरवापर, मतभेद चव्हाट्यावर

कराडात शिंदेसेनेची 'तक्रार', अपक्ष उमेदवाराला 'नोटीस'!
कराड-कराड नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात असणाऱ्या रणजीत पाटील यांनी शिंदेसेनेच्या नेत्यांचा फोटो व चिन्ह अनाधिकाऱ्यांने वापरून मतदारांची दिशाभूल चालवली आहे. त्यांच्यावर कारवाई करावी अशी तक्रार शिंदेसेनेच्या पदाधिकार्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे मंगळवारी केली. त्यावरून निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी रणजीत पाटील यांना नोटीस काढली असून याबाबत खुलासा करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणात नेमके काय होणार? याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.
दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी असणाऱ्या कराड नगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक २ डिसेंबर रोजी होऊ घातली आहे. अर्ज दाखल करणे, छाननी, माघार ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाली असून नगराध्यक्ष पदासाठी ९ उमेदवार रिंगणात उभे आहेत. पैकी रणजीत पाटील हे अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या फ्लेक्स व पत्रकावर त्यांनी शिवसेनेच्या चिन्हाचा ब नेत्यांच्या फोटोचा गैरवापर केल्याची शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांची तक्रार आहे.
खरंतर रणजीत पाटील हे देखील शिंदेसेनेचेच कार्यकर्ते असून एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जातात. परंतु कराड पालिका निवडणुकीत शिंदे सेनेच्या जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र यादव यांनी पक्षीय चिन्हा ऐवजी आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात नगराध्यक्ष पदासाठी दंड थोपटले आहेत. मात्र यामुळे नाराज झालेल्या रणजीत पाटील यांनी देखील अपक्ष उमेदवार म्हणून दंड थोपटले आहेत. या दोघांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून कराडसाठी मोठा विकास निधी आणला असून दोघेही त्यांच्या छबी वापरत आहेत.
मात्र मंगळवारी शिंदेसेनेच्या जिल्हाप्रमुख, शहर प्रमुखांनी त्यांच्या या लेटर पॅड वर रणजीत पाटील यांच्या विरोधात तक्रार दिल्याने शिंदेसेने अंतर्गत वाद आता चांगलाच पेटला आहे. या तक्रारीवरून निवडणूक अधिकार्यांनी रणजीत पाटील यांना नोटीस काढली आहे. पण आता पाटील नेमका काय खुलासा करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे आलेल्या तक्रारीवरून खुलासा करण्याबाबतचे पत्र मला दिले आहे. मी २ दिवसात याबाबतचा खुलासा निवडणूक अधिकाऱ्यांकडे देणार आहे. रणजीत पाटील, अपक्ष उमेदवार, कराड