शेवाळेवाडीतील महिला दारूबंदीसाठी एकवटल्या...
By Admin | Updated: November 15, 2015 23:49 IST2015-11-15T22:18:21+5:302015-11-15T23:49:46+5:30
ग्रामसभेत ठराव : मद्यविक्री केल्यास होणार कारवाई

शेवाळेवाडीतील महिला दारूबंदीसाठी एकवटल्या...
उंडाळे : शेवाळेवाडी-उंडाळे येथील महिला दारूबंदीसाठी आक्रमक झाल्या आहेत. महिलांनी गावात दारूबंदीचा ठराव घेत दारू विकणाऱ्यांना धडा शिकविण्यास सुरुवात केली आहे.कऱ्हाड दक्षिणमधील शेवाळेवाडी गावात गत अनेक वर्षांपासून अवैधरीत्या दारूविक्री व्यवसाय जोमाने सुरू होता. वारंवार गावातील महिलांनी व युवकांनी हा अवैघ दारू व्यवसाय बंद व्हावा, यासाठी प्रयत्न केले. मात्र पोलिसांकडून प्रतिसाद मिळत नव्हता. मिळालाच तर थातूर मातूर कारवाई करून पुन्हा एकदा दारूविक्री केली जायची. याच दारूमुळे अनेकांचे संसार रस्त्यावर आले आहेत. शेवाळेवाडीबरोबरच परिसरातील बहुतांशी गावांमध्ये खुलेआम दारूविक्री केली जाते. येळगाव गावातही अशाच प्रकारे महिलांनी एल्गार पुकारून दारूबंदी केली आहे. मात्र, काही दिवसांत हेच धंदे पुन्हा एकदा जोमाने सुरू झाले. पाटीलवाडी गावात तर हा व्यवसाय खुलेआम केला जात आहे. त्यामुळे या गावात तळीरामांना दिवसासुद्धा झिंग चढत आहे. शेवाळेवाडी गावात ग्रामस्थांनी विशेषत: महिलांनी पुढाकार घेऊन विशेष ग्रामसभेचे आयोजन करीत दारू विक्री बंद व्हावी, यासाठी सर्वानुमते ठराव मंजूर केला. यापुढे दारूविक्री झाल्यास संबंधितावर कठोर कारवाई करण्यात यावी, यासाठी या ठरावाच्या प्रती पोलीस प्रमुख तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना पाठविण्यात आल्या. या ठरावावर सरपंच मेघा शेवाळे, सदस्य रमेश शेवाळे, आनंदीबाई शेवाळे, सागर शेवाळे, सुशांत शेवाळे यांनी स्वाक्षरी केली. ग्रामस्थांच्या पुढाकाराने दारूबंदीचा ठराव करण्यात आला असल्याची माहिती ग्रामसेवक आर. एन. पाटील यांनी दिली. (वार्ताहर)
पोलिसांच्या आशीर्वादाने येथील विक्रेता दारूविक्री करीत होता. मात्र आता यापुढे संबंधिताने दारूविक्री केली तर त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. तसे पत्र आम्ही पोलिसांना दिले असून, पोलिसांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
- धोंडिराम शेवाळे, उपसरपंच, शेवाळेवाडी