चारा-पाण्याच्या शोधात मेंढपाळ परळी भागात

By Admin | Updated: February 23, 2015 00:24 IST2015-02-22T22:18:22+5:302015-02-23T00:24:57+5:30

सहा महिन्यांची वारी : गावोगावच्या शिवारात फिरतायत मेंढरांचे कळप

Shepherds in the shepherd's search for fodder | चारा-पाण्याच्या शोधात मेंढपाळ परळी भागात

चारा-पाण्याच्या शोधात मेंढपाळ परळी भागात

परळी : गावाकडं एवढ्या बकऱ्या, मेंढ्यांना पोटभर चारा-पाणी न्हाय. त्यामुळं मेंढरांचा कळप घेऊन भटकंती करावी लागतेय. गावाकडं पोराबाळांना ठेवून या भागात आलोय; पण हितंबी चारा-पाण्याची चणचण भासतीय. ही प्रतिक्रिया आहे परळी भागात डेरेदाखल झालेल्या लोणंद भागातील मेंढपाळांची.फेब्रुवारी महिना संपायला आला की, गावाकडं पाण्याची टंचाई सुरू होते. माणसांना पिण्यासाठी पाणी आणायला दोन-दोन किलोमीटरची पायपीट करावी लागते. काही जण बैलगाडीतून दूरवरून पाणी आणतात. पण माणसांनाच पुरेल एवढे पाणी पुरत नाही. मग बकऱ्या, मेंढरं अन् गुराढोरांसाठी पाणी कुठून आणणार? मुक्या जनावरांसाठी गाव सोडावं लागतं. मेढरं जगणविण्यासाठी चारा-पाण्याच्या शोधात मेंढपाळांची डिसेंबर महिन्यापासून भटकंती सुरू होते. पुरेसा चारा-पाणी मिळेल त्या गावी मेंढपाळ राहुट्या टाकतात. सहा-सहा महिने शेळ्या-मेंढ्यांची वारी एका भागातून दुसऱ्या भागात अशी सुरू असते.मेढरांना खास मिळावा म्हणून दिवसभर त्यांना घेऊन रानोमाळ भटकावं लागतं. आणि रात्री कुणाच्या तरी शेतात नाहीतर गावानजीक आसरा करावा लागतो. गावाजवळ एवढ्यासाठीच की रात्रीच्या वेळी मेंढरं चोरीला जाण्याच्या घटना घडू लागल्या आहेत.गेली सोळा वर्षांपासून लोणंद येथील मेंढपाळ या भागातल गावांमध्ये येत आहेत. त्यामुळे येथील लोक त्यांच्या चांगले परिचयाचे झाले आहे. मेंढपाळांना चहापाणी, नाष्टाही येथील लोक प्रेमाने देतात. ज्या कुटुंबात लहान मुले असतात, त्यांना राहण्यासाठी जागा, रिकामे घरही दिले जाते. (वार्ताहर)

शेतात बसायला तीन पायली धान्य
मेंढपाळ गावागावांत जाऊन शेतकऱ्यांना भेटतात. ज्या शेतकऱ्याला आपल्या शेतात मेंढरं बसवायची आहेत, त्याने प्रतिदिन मेंढपाळाला तीन पायली धान्य आणि पाचशे रूपये द्यावे लागतात. एका शेतात जास्तीत जास्त तीन दिवस मेंढरं बसवली जातात. शेताला लेंडीखत मिळावे, हा त्यामागचा उद्देश असतो.

परळी, ठोसेघर, लावंघर भागात भरपूर चारा व पाण्याची उपलब्धता असल्यामुळे वर्षानुवर्षे या भागात आम्ही येत असतो. येथील लोकांचेही चांगले सहकार्य मिळते.
- महेंद्र सोळांबे, मेंढपाळ, लोणंद

Web Title: Shepherds in the shepherd's search for fodder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.