‘त्या’ म्हणाल्या, ‘मुलीसारखी तू माझ्या, पुरवीन सारे कोड!
By Admin | Updated: November 21, 2015 00:23 IST2015-11-20T23:21:38+5:302015-11-21T00:23:20+5:30
‘माउली’साठी जमल्या सुवासिनी : पिलेश्वरीनगरातील शेतकरी कुटुंबात रंगलं चक्क गायीचं डोहाळजेवण - गुड न्यूज

‘त्या’ म्हणाल्या, ‘मुलीसारखी तू माझ्या, पुरवीन सारे कोड!
राजीव मुळ्ये -- सातारा ‘काय खावेसे वाटते... आंबट ते गोड गोड, मुलीसारखी तू माझ्या... पुरवीन सारे कोड’ अशी डोहाळजेवणाची गाणी महिलांना तोंडपाठ असतात. मुलीसारखे लाड-कोड पुरवण्याचं आश्वासन सासू या गीतातून सुनेला देते... पण हेच आश्वासन शेतकरी घरातली सुवासिनी जेव्हा चक्क आपल्या गायीला देते, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावतात..!
होय, सातारा शहरालगत पिलेश्वरीनगर भागातल्या शेतकरी कुटुंबात बुधवारी चक्क गायीचं डोहाळजेवण रंगलं. अजय सुधाकर इंदलकर हे कर्मानं शेतकरी अन धर्मानं वारकरी. या संप्रदायात देशी गायीचं माहात्म्य मोठं. साडेनऊ वर्षांपूवी त्यांनी पंढरपूरला अभिषेक केला. देशी गायीची ओढ तेव्हाच निर्माण झाली आणि बंडातात्या कऱ्हाडकर यांच्याकडून त्यांनी एक भाकड गाय आणली. तिला औषधपाणी केल्यावर ती गाभण राहिली. पण ती लहान मुलांना मारायला लागल्यामुळं वेळे येथील जैन मंदिराला देऊन टाकली.
नंतर कोरेगावमधून ही गाय आणली. ‘माउली’ तिचं नाव. आता ती तिसऱ्यांदा गाभण आहे. इंदलकर यांच्या पत्नी हर्षदा यांनी या गायीचं डोहाळजेवण करण्याची कल्पना मांडली. सगळ्यांनी ती उचलून धरली आणि करंजे, पिलेश्वरीनगर भागातल्या दोन-अडीचशे महिलांच्या उपस्थितीत बुधवारी थाटामाटात हे डोहाळजेवण झालंही! एखाद्या गर्भवती महिलेचे लाड-कोड पुरवावेत, तसे ‘माउली’चे पुरवले गेले. तिचं औक्षण केलं. तिच्यासमोर एका घमेल्यात बर्फी, दुसऱ्यात पेढे ठेवले. पाच प्रकारची फळं ठेवली. डोहाळजेवणात जसे महिलेला फुलांचे बाजूबंद घालतात, तसे ‘माउली’च्या पुढच्या पायात घातले. डोईवर फुलांचं बाशिंग. सर्व महिलांना भोजन. नंतर भजन-कीर्तन. दुपारी तीन ते रात्री अकरापर्यंत हा सोहळा सुरू होता. कार्तिक महिन्यात नव्या साडीची घडी मोडण्यापूर्वी ती गायीच्या अंगावर घालण्याची प्रथा आहे. डोहाळजेवणाच्या निमित्तानं ‘माउली’च्या अंगावर हिरवी साडी घालण्यात आली. वसुबारशादिवशीही ‘माउली’ची पिलेश्वरीनगरात वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली होती आणि अन्नदानही करण्यात आलं होतं.
वसाहतीत बांधलं विठ्ठल मंदिर
चार वर्षांपूर्वी पिलेश्वरीनगरात इंदलकर यांनी कुणाकडून एक पैसा न घेता विठ्ठल मंदिर बांधलंय. त्यांच्याकडे पैसे नव्हते तेव्हा त्यांचे बंधू अमोल यांनी पन्नास हजाराचा चेक दिला. ते गुजरातमध्ये लष्करी सेवेत आहेत. बांधकाम सुरू झालं. नंतर बंधूंनी पुन्हा दहा हजार दिले. उसाचे पैसे आल्यावर सोसायटीचं कर्ज परत करून उरलेल्या रकमेत बांधकाम पूर्ण करण्यात आलं. हे मंदिर आणि महाप्रसाद याचा खर्च दोन लाख पासष्ट हजारांवर पोहोचला.
कुटुंबात सात्त्विक वातावरण
अजय इंदलकर यांना संजना आणि अक्षता या दोन मुली आणि अथर्व हा मुलगा. बंधू अमोल आणि त्यांच्या पत्नी अश्विनी यांना समृद्धी आणि आदित्य अशी दोन अपत्यं. अजय यांनी मुलगा अथर्व याला सांप्रदायिक शिक्षण घेण्यासाठी मेढ्याजवळ अंबेघरला पाठवलंय. आई सुमन यांच्यासह सर्वांनी घरात सात्त्विक वातावरण राखलंय. याचा परिपाक म्हणून शाहूपुरीतले पशुचिकित्सक गर्गे हे त्यांच्या गायीला विनामूल्य उपचार पुरवतात.