उत्सुकतेपोटी पवार थेट कार्यशाळेत!
By Admin | Updated: June 27, 2014 00:58 IST2014-06-27T00:53:58+5:302014-06-27T00:58:02+5:30
कऱ्हाड : सोशल मीडियाकडे दुर्लक्ष करू नका; राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना आवाहन

उत्सुकतेपोटी पवार थेट कार्यशाळेत!
कऱ्हाड : राष्ट्रवादी काँग्रेसने गुरुवारी कऱ्हाडात सोशल मीडियाबाबत खास कार्यशाळा आयोजित केली होती. त्याला खासदार सुप्रिया सुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. मात्र, कऱ्हाड दौऱ्यावर असणाऱ्या शरद पवारांना सोशल मीडियाबाबतच्या उत्सुकतेने स्वस्थ बसू दिले नाही. वेणुताई चव्हाण स्मारकात बैठकीसाठी गेलेले पवार थेट सभागृहात गेले अन् त्यांनी तरुणांशी संवाद साधला. त्यांच्या अनपेक्षित आगमनाने तरुणाईत उत्साहत तयार झाला.
‘सोशल मीडिया संवाद साधण्यासाठी एक चांगले माध्यम आहे. त्यामुळे या तंत्रज्ञानापासून दूर जाऊन चालणार नाही. आम्ही याकडे दुर्लक्ष केले त्याची किंमत आम्ही आज मोजत आहोत. म्हणून यापुढे तुम्ही या माध्यमाकडे दुर्लक्ष करू नका, फक्त याचा वापर जागरुकपणे करा. पक्षाची ध्येय धोरणे लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी करा,’ असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
येथील वेणुताई चव्हाण स्मारकात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील तरुण कार्यकर्त्यांसाठी ‘सोशल मीडिया’ या विषयाची कार्यशाळा घेण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी पालकमंत्री शशिकांत शिंदे, खासदार सुप्रिया सुळे, आमदार बाळासाहेब पाटील आदींची उपस्थिती होती.
शरद पवार म्हणाले, ‘सोशल मीडियात तुम्हाला किती इंटरेस्ट आहे, हे बघायला मी आवर्जून येथे आलो आहे. आज ७० ते ८० टक्के विद्यार्थी सोशल मीडिया वापरतात. शेतकरी मागासलेला असला तरी त्यांची तरुण पिढी सुधारलेली आहे.
या माध्यमाचा आपण आपल्या पक्षाच्या प्रचारासाठी वापर केला पाहिजे. तरुणांने आपले ग्रुप व्हॉट्स अॅपवर तयार केले पाहिजेत. त्यावर एखादी पक्षाला टार्गेट करणारी पोस्ट आली तर ती खुडून काढली पाहिजे अन् आपले चांगले काम इतरांपर्यंत पोहोचविले पाहिजे.’
खासदार सुप्रिया सुळे यांनी भाषण न करता तरुणांशी संवाद साधला. या कार्यशाळेचा उपयोग आहे का? असं उपस्थितांनाच विचारलं अन् त्याचा वापर पक्षाच्या चांगल्या प्रसारासाठी कसा करायचा, हे पटवून दिलं. राजकारणात यशस्वी अन् मोठं होण्यासाठी वाचनाची गरज आहे. पुस्तके, पेपर वाचायला अडचण असेल तर ई-पेपर वाचा, असा सल्ला द्यायला त्या विसरल्या नाहीत. (प्रतिनिधी)