Lok sabha 2024: साताऱ्याच्या क्रांतीचा शरद पवार जागविणार इतिहास
By नितीन काळेल | Updated: March 28, 2024 18:52 IST2024-03-28T18:51:38+5:302024-03-28T18:52:59+5:30
पावसात भिजलेल्या सभेने इतिहास घडवला..

Lok sabha 2024: साताऱ्याच्या क्रांतीचा शरद पवार जागविणार इतिहास
सातारा : सातारा जिल्ह्याला क्रांतीचा इतिहास आहे. त्यामुळेच शरद पवार हे नवीन कोणतीही गोष्ट करताना साताऱ्याचीच निवड करतात. चुकीचे आणि अन्यायकारक होत असेलतर त्या विरोधात आवाज उठविण्याचे उत्तम ठिकाण म्हणूनही ते साताऱ्याकडेच पाहतात. त्यामुळे शुक्रवारी पवार हे साताऱ्यात येत असून यानिमित्ताने लोकसभा निवडणुकीचेच रणशिंग फुंकण्याचे संकेत मिळत आहेत.
महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचा जिल्हा सातारा. आजही राज्याचे राजकारण करताना यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराचा वारसा सांगितला जातो. याच पध्दतीने चव्हाण यांचे मानसपूत्र म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचेही सातारा जिल्ह्यावर नितांत प्रेम. तसेच सातारा जिल्हाही प्रत्येकवेळी पवार यांच्या पाठिशी ठामपणे उभा राहिला आहे. राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर १९९९ च्या लोकसभा निवडणुकीत तर कऱ्हाड आणि सातारा मतदारसंघाचे खासदार शरद पवार गटाचे होते. त्याचबरोबर त्याचवर्षीच्या विधानसभा निवडणुकीत आठ आमदार राष्ट्रवादीचे निवडूण आले होते. त्यामुळे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून साताऱ्याकडे पाहिले जाते.
सातारा जिल्ह्याचे सुपूत्र यशवंतराव चव्हाण यांचा स्मृतिदिन २५ नोव्हेंबरला असतो. त्यामुळे दरवर्षी शरद पवार हे न चुकता कऱ्हाडला प्रीतिसंगमवर जाऊन चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करतात. तसेच नवीन गोष्टी करायच्या असतील तर पवार हे साताऱ्याची निवड करतात हे वारंवर समोर आलेले आहे. त्यामुळे आठ महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये उभी पडल्यानंतर शरद पवार यांनी जराही विचलीत न होता दुसऱ्या दिवशीच कऱ्हाड गाठले. त्या ठिकाणी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी आशीर्वाद घेऊन एल्गार पुकारला होता. त्यावेळी कऱ्हाडमधील छोटेखानी सभेत सत्ताधाऱ्यांना रोखठोक इशाराही दिलेला. त्याचवेळी पवार यांनी सातारचे वैशिष्ट दाखवून दिले. तर त्यानंतर सातारच्या शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेऊन साताऱ्याचा महिमाही सांगितला.
सातारचं वैशिष्टच असं की चुकीचं, अन्यायकारक आणि अत्याचार होत असेल तर त्याच्या विरोधात आवाज उठवायचा असलातर त्यासाठी उत्तम ठिकाण सातारा’ असे जाहीरपणे सांगितले होते. त्यामुळे सातारचे महत्व अधोरिखत होते. याचमुळे लोकसभा निवडणुकीचा पार्श्वभूमीवर पवार शुक्रवारी साताऱ्यात येऊन नवीन घोषणा काय करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
पावसात भिजलेल्या सभेने इतिहास घडवला..
२०१९ मध्ये लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक झाली होती. त्यावेळी सातारा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उदयनराजे भोसले हे तिसऱ्यांदा खासदार झाले. पण, त्यानंतर काही महिन्यातच त्यांनी खासदारीकीचा राजीनामा दिला. त्यामुळे विधानसभेबरोबरच सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक झाली. या प्रचारासाठी शरद पवार यांची जिल्हा परिषद मैदानावर हजारोंच्या उपस्थितीत सभा झाली. पवार बोलण्यास उभे राहिल्यानंतर पाऊस सुरू झाला. तरीही त्यांनी भिजतच भाषण सुरू ठेवले. त्यामुळे सर्वत्र वेगळाचा संदेश गेला आणि पावसाच्या सभेने राज्यात इतिहास घडविला. याची नोंदही सातारा जिल्ह्याने करुन ठेवली आहे.
प्रीतिसंगमावरुन एल्गार; तुमचा बेंदूर, आमची गुरूपाैर्णिमा..
राष्ट्रवादीत २ जुलै २०२३ फूट पडली. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच शरद पवार कऱ्हाड येथे गुरू यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी आले. यावेळी वयाच्या ८३ वर्षी त्यांनी पुन्हा दंड थोपटले. प्रीतिसंगमवरच सभा घेऊन एल्गार पुकारला. त्यावेळी त्यांनी यशवंतराव चव्हाण हे तुमचे, आमचे सर्वांचे गुरू आहेत. महाराष्ट्रात जनमत तयार करण्याचे काम करायचे आहे. यशवंतराव चव्हाण यांचा आशीर्वाद घेऊनच करत आहे. यासाठी त्यांना वंदन केले, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच याच दिवशी योगायोगाने बेंदूर सण होता. त्यामुळे त्यांनी तुमचा बेंदूर असलातरी आमची गुरूपाैर्णिमा आहे, असे भावनिक आवाहनही केले होते.