आंब्रुळकरवाडीत पाण्याची तीव्र टंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:36 IST2021-04-13T04:36:51+5:302021-04-13T04:36:51+5:30
ढेबेवाडी विभागात तीन धरणे आहेत. मात्र, पठारी भाग मोठा आहे. त्यामुळे डोंगर माथ्यावर असलेल्या गावांना कमी-अधिक प्रमाणात पाणीटंचाईच्या झळा ...

आंब्रुळकरवाडीत पाण्याची तीव्र टंचाई
ढेबेवाडी विभागात तीन धरणे आहेत. मात्र, पठारी भाग मोठा आहे. त्यामुळे डोंगर माथ्यावर असलेल्या गावांना कमी-अधिक प्रमाणात पाणीटंचाईच्या झळा बसतात. डोंगर माथ्यावर झालेली प्रचंड वृक्षतोड, घटलेले पर्जन्यमान व पठारावर जलसंधारणाचा अभाव यामुळे भूगर्भातील घटलेली पाण्याची पातळी हे आजचे चित्र आहे. डोंगरातले नैसर्गिक पाण्याचे स्तोत्र नष्ट होऊ लागले आहेत. त्यामुळे अनेक गावांमध्ये उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
आंब्रुळकरवाडी ही भोसगाव ग्रामपंचायीतअंतर्गत येत असून भोसगावच्या पश्चिमेला डोंगर माथ्यावर पाचशे लोकसंख्या असलेल्या या वाडीत उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच दरवर्षी भीषण पाणी टंचाई निर्माण होते. भोसगावला मुबलक पाणी उपलब्ध आहे. मात्र, डोंगर माथ्यावर टंचाई आहे. सध्या शंभर कुटुंबांची दोन-तीन घागरी पाण्यासाठी विहिरीवर झुंबड उडत आहे, तर पशुधन वाचविण्यासाठी पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागते.
- चौकट
कायमस्वरूपी उपाययोजना करा!
आंब्रुळकरवाडीला प्रत्येक वर्षी पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. टंचाई निर्माण झाल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात उपाययोजना करण्यात येते. उन्हाळा संपल्यानंतर पुन्हा पहिले पाढे पंचावन्न अशी परिस्थिती असते. तात्पुरत्या उपाययोजना करण्यापेक्षा पाण्याच्या उपलब्धतेसाठी येथे कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे.
- कोट
भोसगाव ग्रामपंचायती अंतर्गत आंब्रुळकरवाडी डोंगर माथ्यावर आहे. येथील दळणवळणाचा प्रश्न सोडविला आहे. पाण्याचा प्रश्न कायमचा निकालात काढण्यासाठी काय करावे लागेल, याबाबत विचार सुरू आहे.
- प्रतापराव देसाई
उपसभापती, पाटण पंचायत समिती