एरंडाच्या बिया खाल्ल्याने सात मुली अत्यवस्थ
By Admin | Updated: June 27, 2014 00:57 IST2014-06-27T00:57:02+5:302014-06-27T00:57:36+5:30
पाटण तालुक्यातील निगडे येथील घटना

एरंडाच्या बिया खाल्ल्याने सात मुली अत्यवस्थ
ढेबेवाडी : एरंडाच्या बिया खाल्ल्याने निगडे, ता. पाटण या दुर्गम गावातील प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या सात मुलींना उलट्या-जुलाबाचा त्रास होऊन त्यांची प्रकृती चिंताजनक बनली. या सर्वच मुलींना कऱ्हाड येथील कृष्णा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
ढेबेवाडीपासून सुमारे पंचवीस किलोमीटर अंतरावर वाल्मिक पठारावर असलेल्या निगडे या गावांत जिल्हा परिषदेची सातवीपर्यंत शाळा आहे. बुधवारी सायंकाळी शाळा सुटल्यानंतर याच गावातील काही मुलींनी घरी जाताना रस्त्याकडेला असलेल्या एरंडाच्या बिया दिसल्या. त्या खाल्ल्या त्यांनी खाल्ल्या. नंतर त्या घरी पोहोचल्यानंतर काही वेळात त्यांना उलट्या-जुलाबाचा त्रास होऊ लागला. ही बाब नातेवाइकांच्या ध्यानात आल्यानंतर त्यांनी मुलींची चौकशी केली. मुलींनी एरंडाच्या बिया खाल्ल्याचे सांगितले.
नेहरु युवा मंडळाचे कार्यकर्ते व माजी सरपंच हणमंत कदम यांनी ढेबेवाडीतील ग्रामीण रुग्णालयाशी संपर्क साधला. डॉ. सुनील कांबळे व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मुलींची प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना कऱ्हाडकडे पाठविण्यात आले.
मयूरी सुरेश कदम (वय ९), प्रिया सुरेश कदम (वय ७), सायली दाजी कदम (वय ७), साक्षी तानाजी टेटमे (वय ८), तेजस्वी तानाजी टेटमे (वय ७), मंदिरी सखाराम नांगरे (वय ८), रिया सुरेश कदम (वय ७) अशी बाधित मुलींची नावे आहेत. या सात मुलींवर कऱ्हाड येथे उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. (वार्ताहर)