विलगीकरणाची व्यवस्था... प्रशासनाची अनास्था !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:27 IST2021-05-31T04:27:40+5:302021-05-31T04:27:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोनाची तिसरी लाट थोपविण्यासाठी राज्यातील अनेक जिल्हे तयारीला लागले असताना सातारा जिल्हा प्रशासनाला दुसरी ...

विलगीकरणाची व्यवस्था... प्रशासनाची अनास्था !
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोरोनाची तिसरी लाट थोपविण्यासाठी राज्यातील अनेक जिल्हे तयारीला लागले असताना सातारा जिल्हा प्रशासनाला दुसरी लाट थोपवितानाच नाकी नऊ आले आहेत. संचारबंदी करा, निर्बंध कठोर करा, आणखी काही करा; परंतु कोरोनाचा आकडा रोज उच्चांक गाठू लागला. जिल्ह्यातील मंगल कार्यालय, कॉलेज, वसतिगृह सध्या बंद आहे. येथे संस्थात्मक विलगीकरणाची व्यवस्था होऊ शकते. मात्र प्रशासनाच्या अनास्थेमुळे जिल्ह्याची कोरोना स्थिती आता हाताबाहेर जाऊ लागली आहे.
संचारबंदीचे निर्बंध अधिक कठोर केले असताना सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीचा वेग काही केल्या थांबेना. तो रोखण्यासाठी प्रशासन पुरेपूर प्रयत्न करीत असले तरी या प्रयत्नांना म्हणावे असे यश अद्यापही आलेले नाही. ठोस उपाययोजना राबविण्यासाठी प्रशासन कमी पडत असल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या मुंबई, पुणेसारख्या शहरांनाही मागे टाकू लागली आहे.
सद्य:परिस्थितीत जिल्ह्यात १५ हजार ५३४ कोरोनाग्रस्त घरातून; तर दोन हजार ९७९ रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. संचारबंदीचे निर्बंध कठोर असताना गृह विलगीकरणातील रुग्ण घराबाहेर पडत असून ते कोरोनाचे वाहक ठरू लागले आहेत. अशा रुग्णांना प्रशासनाने वाऱ्यावर सोडून दिल्याने सातारा, फलटण, कऱ्हाड या तालुक्यांची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनू लागली आहे. कोरोनाची लाट थोपवायची असेल तर प्रशासनापुढे संस्थात्मक विलगीकरण हाच एकमेव पर्याय आहे. जिल्ह्यातील शाळा, कॉलेज, मंगल कार्यालये, वसतिगृहे सध्या बंद आहेत. हे ताब्यात घेऊन येथे विलगीकरणाची व्यवस्था उभी करायला हवी. यासाठी प्रशासनाने मरगळ झटकून सकारात्मक पाऊल पुढे टाकले तरच हे शक्य आहे.
(चौकट)
सातारा, फलटण कऱ्हाडवर लक्ष द्या
कोरोनाबाधित व मृतांच्या संख्येत सातारा, फलटण व कऱ्हाड हे तीन तालुके सध्या आघाडीवर आहेत. जिल्हा प्रशासनाने या तीन तालुक्यांकडे प्राधान्याने लक्ष द्यायला हवे. या ठिकाणी संस्थात्मक विलगीकरणाची व्यवस्था तातडीने उभी केल्यास कोरोनाची साखळी ‘ब्रेकडाऊन’ होण्यास मोठी मदत मिळेल.
(चौकट)
कुठला तरी ‘पॅटर्न’ राबवा; पण राबवा !
गतवर्षी राजस्थानमध्ये ‘भिलवाडा,’ तर यंदा मुंबईत ‘धारावी’ पॅटर्न यशस्वी झाला. धारावी झोपडपट्टीची लोकसंख्या आठ लाखांच्या घरात आहे. कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर आरोग्य यंत्रणेने येथील प्रत्येक कुटुंबाचा सर्व्हे केला. अधिकाधिक नागरिकांची तपासणी करून संशयितांना संस्थात्मक विलगीकरण केंद्रात पाठविले. पॉझिटिव्ह रुग्णांची रुग्णालयात व्यवस्था केली. ठिकठिकाणी कोरोना केअर सेंटर, उपचार केंद्र उभारली. फिव्हर क्लिनिक संकल्पना राबविली. अनेकांना घरपोच धान्य उपलब्ध करण्यात आले. मास्क, फिजिकल डिस्टन्सचे काटेकोर पालन करण्यात आले. त्यामुळेच आशिया खंडातील सर्वांत मोठ्या झोपडपट्टीत कोरोना संसर्ग नियंत्रणात आला. जिल्हा प्रशासनानेदेखील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कुठला तरी ‘पॅटर्न’ राबविणे गरजेचे बनले आहे.
(चौकट)
सातारकरांना हाक देऊन तर बघा
संकटांचा सामना करणं अन् मदतीला धावून जाणं हा सातारी बाणा आहे. आजवरचा इतिहास पाहिला तर कितीतरी संकटे सातारकरांनी एकजुटीने थोपविली आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत सातारकरांच्या दातृत्वाची सर्वांनाच प्रचिती आली. यंदादेखील परिस्थिती गंभीर आहे. ही लाट थोपवायची असेल तर प्रशासनाने सातारकरांना साद घालायला हवी. जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटना, दानशूर व्यक्ती, नागरिक प्रशासनाला प्रतिसाद दिल्याशिवाय राहणार नाहीत.
(चौकट)
ज्यांचा कर्ता पुरुष गेला त्यांना विचारा..
ज्यांना कोरोनाची लागण झाली व ज्यांच्या घरातील कर्ता पुरुष कोरोनाने हिरावला आहे, अशा लोकांची आज काय अवस्था झालीय हे विनाकारण फिरणाऱ्यांनी एकदा पाहावेच. ‘मला काय होतंय, मला काय होणार नाही’ या आविर्भावात राहणं सोडून द्यावं. आपल्याला कोरोना झाला तर दोष कोणाला देणार? आपलं रुग्णालयाचं लाखो रुपयांचं बिल काय प्रशासन भरणार नाही. या सर्व गोष्टींचा नागरिकांनी गांभीर्याने विचार करायला हवा. सर्व दोष प्रशासनाला न देता आपणही जबाबदारीने वागायला हवं. तरच कोरोनाचे संक्रमण रोखण्यास मदत होऊ शकते.