हजार लाेकांच्या सुरक्षिततेची मदार केवळ एका पोलिसावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:12 IST2021-02-06T05:12:10+5:302021-02-06T05:12:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : शहरासह जिल्ह्याचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असला तरीही जिल्हा पोलीस दलाचे मनुष्यबळ वाढताना दिसत नाही. ...

हजार लाेकांच्या सुरक्षिततेची मदार केवळ एका पोलिसावर
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : शहरासह जिल्ह्याचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असला तरीही जिल्हा पोलीस दलाचे मनुष्यबळ वाढताना दिसत नाही. लोकसंख्येच्या तुलनेचा विचार केला तर एक हजार लोकांमागे केवळ एक पोलीस अशी स्थिती आहे. त्यामुळे पोलिसांवर सध्या प्रचंड ताण आहे.
राज्य शासनाने दोन टप्प्यांत पोलीस भरती प्रक्रिया राबविण्याची घोषणा केली आहे. मात्र, यातून सातारा जिल्ह्याला किती मनुष्यबळ मिळणार आहे, हे अद्याप समोर आले नाही. जिल्हा पोलीस दलामध्ये पूर्वी अडीच हजार मनुष्यबळ होते. हळूहळू ही संख्या तीन हजारांहून पुढे गेली. सध्या तीन हजार ९०० मनुष्यबळ आहे. तर जिल्ह्याची लोकसंख्या ३५ लाख आहे. एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या लोकांची सुरक्षा या पोलिसांवर अवलंबून आहे. एकापाठोपाठ एक गुन्हे घडत असल्यामुळे पोलिसांना तपासासाठी वेळच मिळत नाही. फारशा सुट्याही मिळत नसल्यामुळे पोलिसांवरील ताण अधिकच जाणवत आहे. जिल्ह्यात रोज कुठे ना कुठे चाेरी, मारामारी, दरोडा असे प्रकार घडत असतात. पोलिसांची संख्या कमी असल्यामुळे गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण कमी आहे. त्याच तुलनेत दाखल होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.
गुन्हेगारीचा आलेच चढताच...
जिल्ह्यातील जबरी चोऱ्या, घरफोड्या, दरोडे, खून, लूटमार अशा घटना अद्यापही कमी झालेल्या नाहीत. दिवसेंदिवस या गुन्ह्यांमध्ये अधिकच वाढ होत चालली आहे. लाॅकडाऊनमध्ये पोलीस दलाच्या इतिहासात पहिल्यांदाच गुन्ह्याचे प्रमाण कमी होते. केवळ आदेशाचे उल्लंघन केल्याचे गुन्हे दाखल होत होते. लाॅकडाऊन शिथिल झाल्यानंतर पुन्हा गुन्हेगारी पूर्वीपेक्षा जास्त बोकाळली. घरात बसून लोकांची मानसिक स्थिती बिघडली आणि बेकारी वाढली. त्यामुळे लोकांचा संयम सुटत चालला. छोट्या छोट्या गोष्टींतूनही एकमेकांचे मुडदे पाडले. लाॅकडाऊननंतर जिल्ह्यात एकूण १४ खून झाले. तर अत्याचाराच्या घटना दिवसागणिक वाढतच आहेत. अशा प्रकारची गुन्हेगारी रोखण्यासाठी पुरेशा मनुष्यबळाची गरज आहे. त्याचबरोबर गाव पातळीवरील पोलीस ठाणे, पोलीस चाैकी सक्षम करणे, यासह कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी सोडवणे गरजेचे आहे. तरच जिल्हा गुन्हेगारीमुक्त होण्यास मदत होणार आहे.
शहर असो की ग्रामीण दोन्ही पोलिसांवर कामाचा प्रचंड ताण आहे. शहरातील पोलिसांना रात्रंदिवस गस्त घालावी लागते. तर ग्रामीण भागातील पोलिसांना वाड्यावस्त्यांवर गस्त नसली तरी जागृत राहावे लागते. ग्रामीण भागामध्ये एका पोलीस चाैकीअंतर्गत दोनशे ते तीनशे गावे असतात. या चाैकीमध्ये सहा ते सात कर्मचारी असतात. याच कर्मचाऱ्यांवर एवढ्या मोठ्या गावांच्या सुरक्षिततेची जबाबदारी असते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवरही ताण आहेच. ग्रामपंचात, सोसायटी निवडणुकीचा बंदोबस्त या केवळ चार पोलिसांवरच होत असतो. ग्रामीण भागामध्ये चोऱ्या, घरफोडीचे प्रमाण कमी असते. याउलट शहरात चोऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे शहरातील पोलिसांना नेहमी सतर्क राहावे लागते. शहर आणि ग्रामीण पोलिसांच्या मदतीला आणखी हजार, दोन हजार पोलिसांची आवश्यकता आहे.
लाेकसंख्या वाढतेय, पोलिसांची संख्या वाढेना
जिल्ह्याची २०११ च्या जनगणनेनुसार ३० लाख लोकसंख्या होती. त्यानंतर मात्र जनगणना झाली नाही. ही संख्या पाच ते दहा लाखांनी वाढली. मात्र, त्या तुलनेत पोलिसांची संख्या केवळ चारशे आणि पाचशेच्या पटीत वाढत आहे. त्यामुळे पोलिसांवर साहजिकच ताण आहे.