सातारा : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा जिल्ह्यात दाखल असून प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तर वारकऱ्यांच्या सेवेसाठी आरोग्य विभागही सतर्क झाला आहे. यातूनच तीन दिवसांत सोहळ्यातील सुमारे १३ हजार वारकऱ्यांची तपासणी करण्यात आली. त्यातील १७ जणांना रुग्णालयात दाखल केले आहे.दरवर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आळंदी ते पंढरपूर असा जातो. पुणे जिल्ह्यातून सोहळा सातारा जिल्ह्यात दाखल होतो. जिल्ह्यात या सोहळ्याचा लोणंद, तरडगाव, फलटण आणि बरडमध्ये मुक्काम असतो. या सोहळ्यात लाखो वारकरी आणि भाविक सहभागी होतात. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज असते. जिल्ह्यात रविवारी पालखी सोहळा दाखल झाला आहे. या सोहळ्यातील वारकऱ्यांची आरोग्य विभागाकडून तपासणी सुरू आहे. मागील तीन दिवसांत १३ हजार वारकऱ्यांची आरोग्य तपासणी झाली. ताप, सर्दी, खोकला असणाऱ्या वारकऱ्यांवर आैषधोपचार करण्यात आले. तर अधिक त्रास होत असणाऱ्या १७ वारकऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या तपासणीदरम्यान रक्तदाबाचा त्रास होणारे दोन वारकरीही आरोग्य पथकाला आढळून आले. त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत.
Satara: पालखी सोहळ्यातील १३ हजार वारकऱ्यांची तपासणी, आरोग्य विभाग चोवीस तास सेवेत
By नितीन काळेल | Updated: June 20, 2023 12:36 IST