घरावर दरड अन् मनात धडकी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 23:23 IST2019-06-30T23:23:15+5:302019-06-30T23:23:20+5:30
सातारा : केसरकर पेठेतील हरिजन-गिरीजन सोसायटीत एका घरावर शनिवारी रात्री दरड कोसळली. या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र, ...

घरावर दरड अन् मनात धडकी...
सातारा : केसरकर पेठेतील हरिजन-गिरीजन सोसायटीत एका घरावर शनिवारी रात्री दरड कोसळली. या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र, घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रविवारी सकाळी पालिकेच्या बांधकाम विभागाकडून ही दरड हटविण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, केसरकर पेठेत अय्याज इनामदार हे पत्नी व दोन मुलांसमवेत राहतात. हरिजन-गिरीजन सोसायटीनजीक डोंगरउतारवर त्यांचे घर आहे. शनिवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास इनामदार कुटुंबीय जेवण केल्यानंतर झोपी गेले. यावेळी अचानक त्यांच्या घरावर मोठी दरड कोसळली. दरड कोसळल्यानंतर झालेल्या आवाजाने परिसरातील नागरिकांनी धावधाव सुरू केली. दरड पडल्याची घटना निदर्शनास येताच नागरिकांनी अय्याज इनामदार यांना आवाज देऊन झोपेतून जागे केले.
घराच्या दरवाजासमोरच दरड कोसळल्याने बाहेर येण्याचा मार्ग बंद झाला होता. त्यामुळे मागील दरवाजा तोडून इनामदार कुटुंबीयांना घरातून बाहेर काढण्यात आले. दरम्यान, रविवारी सकाळी नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यांनतर पालिका कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या मदतीने जेसीबीच्या साह्याने घरावरील दरड हटविली.
नागरिकांमध्ये
भीतीचे वातावरण
अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी अनेक वसाहती आहेत. पावसाळा सुरू झाला की किल्ल्यावरून दगडी व दरडी कोसळण्याच्या घटना वारंवार घडतात. सातारा शहर व परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळेच हरिजन-गिरीजन सोसायटीनजीक घरावर दरड कोसळली. या घटनेमुुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.