पाण्याला विरोध करणाऱ्यांना आता साताऱ्याचा पुळका
By Admin | Updated: August 18, 2014 21:37 IST2014-08-18T21:10:11+5:302014-08-18T21:37:00+5:30
शशिकांत शिंदे : तावडे-फडणविसांच्या सातारा दौऱ्यावर कडाडून टीका

पाण्याला विरोध करणाऱ्यांना आता साताऱ्याचा पुळका
कुडाळ : ‘विधानसभेत शिवसेना-भाजपचे आमदार हे पश्चिम महाराष्ट्राच्या अनुशेषाला विरोध करण्याचे पाप करतात. प. महाराष्ट्रात आल्यावर हेच आमदार राष्ट्रवादीच्या नावाने ओरडून जनतेची दिशाभूल करण्याचे काम करत आहेत. अशा ओरडणाऱ्या विनोद तावडेंनी महाराष्ट्रातील कोणताही विधानसभा मतदारसंघ निवडावा, मी त्यांच्या विरोधात उभा राहून निवडणूक लढवतो. त्यांनी हे आव्हान स्वीकारावे व लढण्याची तयारी दाखवावी,’ असे आव्हान देत सेना-भाजपचा खरपूस समाचार जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे यांनी घेतला. कुडाळ येथे आयोजित राष्ट्रवादी युवक मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, वसंतराव मानकुमरे, अमित कदम, सभापती रूपाली वारागडे, हणमंतराव पार्टे, मोहनराव शिंदे, सारिका सपकाळ, सुहास गिरी, अॅड. नितीन भोसले, बाळासाहेब महामुलकर, जयदीप शिंदे, सयाजी शिंदे, सौरभ शिंदे, राजेंद्र भिलारे उपस्थित होते. अमित कदम, प्रमोद पवार, वसंतराव मानकुमरे यांची भाषणे झाली. चंद्रकांत गवळी, समीर आतार, सचिन तरडे यांचा सत्कार करण्यात आला. राजेश वंजारी यांनी प्रास्ताविक केले. धनंजय केंजळे, बुवासाहेब पिसाळ, जितेंद्र शिंदे, कांतीभाई देशमुख, पांडुरंग जवळ तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
आता तरी दुटप्पीपणा सोडा!
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत आपल्याच काही मंडळींनी कुडाळ गटात विरोधी काम केले. सुहास गिरींनी तर दीपक पवार तू पण निवडून ये, मी पण निवडून येतो, अशी भूमिका घेतली. त्याचा पक्षाच्या उमेदवाराला फटका बसला तर आता असा दुटप्पीपणा ठेवू नका, असा टोला गिरींना मानकुमारेंनी लगावला. काही कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करू लागले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी सावध राहावे, अशी सूचना त्यांनी आपल्या भाषणात केली.