केरळच्या पूरग्रस्तांसाठी बचावसाठी सातारकर : लेफ्टनंट कर्नल सुजित भोसले यांचे योगदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 21:30 IST2018-08-30T21:28:55+5:302018-08-30T21:30:54+5:30
साताऱ्याचे रहिवाशी व आर्मी एव्हीएशन फोर्स गांधीनगर येथे कार्यरत असलेले लेफ्टनंट कर्नल सुजित भोसले यांनी केरळ येथील मदतकार्यात उल्लेखनीय कामगिरी केली.

केरळच्या पूरग्रस्तांसाठी बचावसाठी सातारकर : लेफ्टनंट कर्नल सुजित भोसले यांचे योगदान
सातारा : साताऱ्याचे रहिवाशी व आर्मी एव्हीएशन फोर्स गांधीनगर येथे कार्यरत असलेले लेफ्टनंट कर्नल सुजित भोसले यांनी केरळ येथील मदतकार्यात उल्लेखनीय कामगिरी केली.
पूरक साहित्य, सामग्री वाहून नेण्यासह शेकडो लोकांचे प्राण वाचविण्यासाठी देखील मोलाची भूमिका निभावली आहे. केरळमध्ये महाप्रलय आल्यानंतर मदत कार्यासाठी गांधीनगर येथील आणि एव्हिएशन पथकाला १८ आॅगस्ट रोजी पाचारण करण्यात आले होते. त्यानुसार नाशिक येथून काही अधिकारी रवाना झाले. त्यामध्ये लेफ्टनंट कर्नल सुजित भोसले यांचा समावेश होता. केरळ येथील मदत कार्यासाठी ६५ हेलिकॉप्टर तैनात करण्यात आली होती. जे रस्ते पाण्याखाली आहेत, त्या भागात पोहोचविण्यासाठी हॅलिकॉप्टरचा वापर करण्यात आला.
लोकांना पुरातून बाहेर काढत सुरक्षितस्थळी पोहोचविण्यासाठी हॅलिकॉप्टर्सच्या टीमने जीवाचे रान केले. पुरातून स्थलांतरित केलेल्या लोकांना मंदिर, मशिद, चर्च, शाळांमध्ये हलविण्यात आले. त्याप्रमाणे अनेक भागांत अन्नाची पाकिटे, औषधे पोहोचविण्याचे काम देखील या युनिटने केले. केरळची पूरस्थिती आता निवळली असून, हे पथक परत आले आहे.
आपत्तीच्या काळात केरळमध्ये अनेक ठिकाणी दाट धुके असल्याने साहित्य सामग्री वाहून नेण्यास अडचण येत होती. तिथेही या पथकाने ते पोहोचविले. या मोहिमेदरम्यान लेफ्टनंट कर्नल सुजित भोसले हे लष्कर एव्हिएशनचे पॉर्इंटमन राहिले. विमानाची सुरक्षा आणि देखभाल यांची जबाबदारी लेफ्टनंट कर्नल सुजित भोसले यांच्यावर सोपविण्यात आली होती.
हॅलिकॉप्टरमधून साहित्याची चढ-उतार
हॅलिकॉप्टरमध्ये साहित्याची चढ-उतार ठराविक वेळेत करून घेण्याची जबाबदारी देखील त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. सातारा सैनिक स्कूलमध्ये लेफ्टनंट कर्नल सुजित भोसले यांचे शिक्षण झाले आहे.