सातारकरांना मिळणार शुद्ध पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2016 23:40 IST2016-04-06T21:36:15+5:302016-04-06T23:40:43+5:30
उदयनराजे भोसले : पाणीपुरवठा सुधारित प्रस्तावास ‘अमृत’ याजनेतून मंजुरी

सातारकरांना मिळणार शुद्ध पाणी
सातारा : ‘व्ही-वायर टेक्नॉलॉजी, वॉटर अॅटोमेशन या आधुनिक सुविधांद्वारे सातारा शहराच्या सध्याच्या पाणीपुरवठा व्यवस्थेत आमूलाग्र बदल आणि सुधारणा असलेल्या ७ कोटी ५२ लाखांच्या प्रस्तावास केंद्र सरकारच्या ‘अमृत’ योजनमधून मंजुरी मिळाली आहे. ‘एमजेपी’च्या माध्यमातून सुचवलेल्या सुधारणा कामांद्वारे सातारकरांसाठी पुरेशा पाणी पुरवठ्याबरोबरच, पाणी पुरवठ्याच्या दर्जात आधुनिक व चांगल्या सुधारणा घडवण्यात येतील,’ अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
सातारा शहराला पाणीपुरवठा अपुरा पडू नये म्हणून आम्ही आजपर्यंत पाणीपुरवठ्याला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. सर्व नागरिकांना स्वच्छ व पुरेसा पाणीपुरवठा होण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील राहिलो आहोत, म्हणूनच कासची बंदिस्त पाईपलाईन योजना सर्वप्रथम मार्गी लावली. केंद्राच्या यूआयडीएसएसएमटीच्या माध्यमातून सातारा शहरात आणि उपनगरांच्या सुविधेसाठी, सातारा नगरपरिषद आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकारण यांच्या मार्फत ठिकठिकाणी नवीन टाक्यांची उभारणी व जलवाहिन्यांचे जाळे निर्माण करण्यात आले आहे. तसेच सातारा व आसपासच्या उपनगरांना ग्रॅव्हिटीने बिनखर्चिक पाणीपुरवठा करणारी कण्हेर उद्भव योजना मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे.
अशा विविध योजनांद्वारे नवीन पाणीपुरवठा व्यवस्था साकारताना, सध्या असलेल्या पाणीपुरवठा व्यवस्थेच्या यंत्रणेमध्ये सुधारणा करण्यासाठी आम्ही ‘एमजेपी’ला सूचना केल्या होत्या. सध्या पाण्याची टाकी भरणे, व्हॉल्व्ह सोडणे ही कामे मॅन्युअली होत आहेत, वॉटर अॅटोमेशनमध्ये टाक्या भरणे, बंद करणे, टाक्यातील पाणी सोडणे, व्हॉल्व्ह चालू व बंद करणे, आदी कामे कॉम्पुटराईज्ड होणार आहेत.
पाणी फिल्टरेशन करण्याकरिता व्ही-वायर टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येणार असल्याने, पाण्याच्या शुद्धीकरण प्रक्रियेत सुधारणा होऊन अधिक चांगल्या दर्जाचे पाणी नागरिकांना उपलब्ध होणार आहे. असेही उदयनराजे यांनी शेवटी नमूद केले आहे. (प्रतिनिधी)
योजनेतील कामे..
या योजनेअंतर्गत विसावा जलशुद्धीकरण केंद्राची नवीन सिव्हिल इंजिनिअरिंगची कामे करणे, डागडुजी करणे, पाण्याच्या फिल्टरेशनकरिता व्ही-वायर टेक्नॉलॉजीचा वापर करणे, माची पेठ येथे पाच लाख लिटर्स पाणी साठवण क्षमतेची जमिनीवरील बैठी टाकी उभारणे, कात्रेवाडा येथे नवीन पाच लाख लिटर्स साठा क्षमतेची उंच टाकी उभारणे तसेच माहुली येथील पंपिंग स्टेशनद्वारे पाणी उचलण्यापासून ते पाणी ग्राहकांच्या, नागरिकांच्यापर्यंत पोहोचवणे या संपूर्ण प्रक्रियेचे अॅटोमेशन करणे आदी कामांचा समावेश असल्याची माहिती उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.