साताऱ्याच्या हद्दवाढीचा निर्णय आठ दिवसांत : मुख्यमंत्री
By Admin | Updated: June 8, 2016 00:09 IST2016-06-07T22:41:32+5:302016-06-08T00:09:22+5:30
उदयनराजेंची मंत्रालयात भेट : निवडणुकीआधी प्रश्न मार्गी लावा

साताऱ्याच्या हद्दवाढीचा निर्णय आठ दिवसांत : मुख्यमंत्री
सातारा : सातारा शहराची प्रलंबित असलेली हद्दवाढ येत्या आठ दिवसांत करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना दिले. खासदार उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी मुंबई येथे मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. ‘शहराची हद्दवाढ रखडल्याने अनेक वर्षांपासून उपनगरांना सोयीसुविधा देणे अवघड होत असून, नगरपालिका निवडणुकीआधी हा प्रश्न मार्गी लावणे गरजेचे आहे. ११ एप्रिल रोजी या हद्दवाढीची अंतिम फाईल आपल्या टेबलावर आली असून, त्याचा लवकरात लवकर निर्णय घ्यावा,’ अशी विनंती उदयनराजे यांनी यावेळी केली. त्यावर ‘साताऱ्याच्या हद्दवाढीची फाईल आता आपल्यापर्यंत पोहोचली असून, आठवड्याभरात त्याबाबतची अधिकृत सूचना काढण्यात येईल,’ असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नगरपालिका निवडणुकीआधी हद्दवाढीचा प्रश्न निकालात निघेल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांच्या या आश्वासनामुळे वर्षानुवर्षे रखडलेला हद्दवाढीचा प्रश्न सुटणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीप्रसंगी नगरसेवक अॅड. दत्ता बनकर, अशोक सावंत यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)