सातारा : ‘भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात साताऱ्याची प्रतिसरकार चळवळ प्रभावी ठरली. त्यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील आणि क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांचे योगदान मोलाचे आहे,’ असे मत वाळवा येथील हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहाचे प्रमुख वैभव नायकवडी यांनी व्यक्त केले.
सातारा येथे जिल्हा कारागृहासमोर जेलफोड शौर्यदिन कार्यक्रमात नायकवडी बोलत होते. क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी हे सातारा जेलच्या भिंतीवरून उडी मारून भूमिगत झालेल्या घटनेला ७७ वर्षे झाली. यानिमित्ताने कारागृहाच्या बाहेर जेलफोड शौर्यदिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, शिराळा पंचायत समितीचे सभापती बाळासाहेब नायकवडी, वीरधवल नायकवडी, हुतात्मा सहकारी साखर कारखान्याचे संचालक पोपट फाटक, आनंदराव सूर्यवंशी, महादेव माने, शरद खोत, ज्येष्ठ पत्रकार विजय मांडके, प्रा. डॉ. हसीम वलाणकर, उत्तम घोलप, चांदभाई काझी, बाळासाहेब माने, शिवाजी काळे, बाळासाहेब पाटील, जालिंदर यादव, प्रा. सुभाष ढगे, गणेश दुबळे आदी उपस्थित होते.
वैभव नायकवडी म्हणाले, ‘ब्रिटिशांचा क्रूर पोलीस अधिकारी गिल्बर्टला न जुमानता क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांनी स्वातंत्र्याचा लढा सुरुच ठेवला. साताऱ्याच्या जेलमध्ये ठेवल्यावर काही दिवसांतच अण्णांनी जेलच्या तटावरुन उडी मारली व स्वातंत्र्यचळवळीसाठी संपूर्ण आयुष्य अर्पण केले.’
डॉ. अनिल पाटील म्हणाले, ‘क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांनी स्वातंत्र्यलढ्यात दिलेले योगदान व स्वातंत्र्यानंतर केलेल्या त्यागामुळे लोकांच्या जीवनात सुखसमृद्धी आली. कर्मवीर भाऊराव पाटील आणि नागनाथअण्णा यांचे स्वातंत्र्यपूर्व काळात संबंध चांगले होते. त्यानंतर आताही या दोन्ही कुटुंबांत जिव्हाळ्याचे नाते आहे. त्याकाळात नागनाथअण्णांनी रयत शिक्षण संस्थेसाठी एक लाखाची मदत केली. ही भेट मौल्यवान अशीच होती.’
या कार्यक्रमाला सांगली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांबरोबरच साताऱ्यातील नागरिकही उपस्थित होते.
फोटो दि.१०सातारा जेल फोटो...
फोटो ओळ : सातारा येथे शुक्रवारी झालेल्या जेल फोडो शौर्यदिन कार्यक्रमाला वैभव नायकवडी, डॉ. अनिल पाटील, विजय मांडके, गणेश दुबळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
....................................................