सातारा : क्रीडा स्पर्धा म्हणजेच फक्त खेळ असे समीकरण डोळ्यासमोर उभे राहते. पण, सातारा जिल्हा परिषदेच्या स्पर्धेच्या निमित्ताने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मुख्यालय आणि प्रत्येक तालुक्यांचे एक-दोन नव्हे तर १२ चित्ररथ काढून वैविध्यपूर्ण दर्शन घडवले. यामध्ये पंढरपूरच्या वारीचा चित्ररथ काढून ज्ञानोबा-तुकारामाचा गजर केला. तसेच स्वातंत्र्यलढा, शिवराज्याभिषेक आणि देशातीतील विविधेतील एकेतेचेही दर्शन घडवले. यामुळे सर्वांचाच उत्साह वाढीस मदत झाली.जिल्हा परिषदेच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा म्हणजे एक उत्साह असतो. यासाठी जिल्हा परिषद मुख्यालयाचा एक आणि ११ तालुक्यांचे प्रत्येकी एक असे १२ संघ स्पर्धेतील विविध क्रीडा स्पर्धेत सामील आहेत. त्यातच तीन दिवस सोहळा असल्याने सर्वजण मनापासून आणि उत्साहाने सामील होतात. शुक्रवारी जिल्हा क्रीडा संकुलात या स्पर्धेला सुरूवात झाली. यावेळी क्रीडाज्योत प्रज्वलीत केल्यानंतर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सीद यांच्यासह इतर अधिकाऱ्यांसमोर मुख्यालय आणि ११ तालुक्यांच्या चित्ररथांनी दर्शन घडवले.
जिल्हा परिषद मुख्यालयाच्या संघाचा चित्ररथ लक्षवेधक ठरला. पंढरीच्या वारीचा चित्ररथ सादर करण्यात आला. यामध्ये टाळ-मृदंगाच्या गजरात वारी आणि वारकरी निघाल्याचे दिसून आले. यामध्ये घोडाही होता. या घोड्याने गोल रिंगणही पार केले. तसेच जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी विठ्ठल आणि रुक्मीणीची वेशभूषाही केली होती. त्यामुळे खरोखरच आपण पंढरपूरच्या वारीत असल्याचा भास होत होता. यावेळी ज्ञानोबा माऊली-तुकाराम असा टाळावर जयघोष करण्यात येत होता. जावळी तालुक्याने शिवराज्याभिषेकाचा चित्ररथ तयार केला होता. सर्वच तालुक्यांनी चित्ररथातून दर्शन घडवले. यामुळे क्रीडा स्पर्धेत उत्साह वाढला.
विविधतेतून एकतेचे दर्शन; उपस्थितांना संदेशही..जिल्हा परिषद अंतर्गत सर्वच १२ चित्ररथ हे आकर्षक आणि संदेश देणारे होते. यामध्ये योजनांचा प्रसार, ज्ञान, शिक्षण तसेच अध्यात्मिक संदेशाचे चित्ररथ होते. कोरेगाव तालुक्याच्या चित्ररथातून विविधतेतून एकतेचा संदेश देण्यात आला. यामध्ये विविध गाणी सादर करण्यात आली. पुरूष आणि महिला कर्मचारी सहभागी झाले होते. तसेच पर्यावरणाचे महत्व असणारेही चित्ररथ होते.