सातारा: एका तरुणाचे मध्यरात्री त्याच्या घरातून सात ते आठ जणांनी अपहरण केले. कारमधून त्याला विविध ठिकाणी फिरवून बेदम मारहाण करण्यात आली. त्यातील एका युवकाने अपहृत तरुणाच्या तोंडावर लघुशंका केली. रात्रभर त्याला मारहाण करून सकाळी सोडून देऊन संबंधित संशयित पसार झाले. शिरवळ पोलिसांनी आठ जणांवर गुन्हा दाखल करून यातील दोघांना अटक केली. ही घटना दि.१९ रोजी घडली. हे धक्कादायक प्रकरण शिरवळ (ता. खंडाळा) येथे समोर आले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अनिल ऊर्फ पाप्या श्यामराव वाडेकर (वय ३०, रा. शिरवळ), वैभव नवथरे (३२, मूळ रा. खंडाळा, सध्या शिरवळ), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत, तर सोमनाथ शंकर राऊत (२५, रा. न्यू रामेश्वर कॉलनी, शिरवळ), असे मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, सोमनाथ राऊत याचे दि. १९ रोजी रात्री दीड वाजता त्याच्या घरातून संशयित आठ जणांनी अपहरण केले. कारमध्ये बसवून त्याला खंडाळा, वेळे, भुईज कारखान्याजवळील घाटात नेले. या ठिकाणी तलवार पोटाला लावली. त्यानंतर सर्वांनी हाताने व कमरेच्या पट्ट्याने बेदम मारहाण केली.
तोंडावर लघुशंका केली
एका संशयिताने सोमनाथच्या तोंडावर लघुशंका केली. येथून परत सातारा तालुक्यातील शिवथर येथे एका घरात त्याला नेण्यात आले. या ठिकाणीही त्याला बेदम मारहाण करण्यात आली. दरम्यान, सकाळी ८ वाजता सोमनाथला शिरवळ येथे सोडण्यात आले.
मारहाणीचा व्हिडीओ कॉल!
सोमनाथ याला संशयित मारहाण करत असताना याचा व्हिडीओ कॉल इतरांना दाखवत होते. तेव्हा संशयित आरोपी वैभव नवथरे हा संबंधितांना मारा असे म्हणून प्रोत्साहन देत होता.