साताऱ्याचे पाणी दर मंगळवारी बंद
By Admin | Updated: March 20, 2016 00:18 IST2016-03-20T00:18:30+5:302016-03-20T00:18:30+5:30
पालिकेचा निर्णय : ‘कास’ची पाणीपातळी खालावली

साताऱ्याचे पाणी दर मंगळवारी बंद
सातारा : कास तलावातील पाणीपातळी खालावत चालल्याने शहरातील पाणीपुरवठा कपात करण्याचा निर्णय पालिकेने सभेमध्ये घेतला होता. त्याची अंमलबजावणी सुरू झाली
असून, आठवड्यातून दर मंगळवारी शहराला पाणीपुरवठा होणार नाही. त्यामुळे नागरिकांनी आदल्या दिवशी पाणी साठवून ठेवावे व ते काटकसरीने वापरावे, असे आवाहन मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी केले आहे.
सातारा शहरातील नागरिकांना शहापूर व कास तलावातून पाणीपुरवठा केला जातो; मात्र गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्याने त्याचे परिणाम आता जाणवत आहेत. त्यातच सध्याचा असणारा पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे.
कास तलावातून सातारा शहराला तीन व्हॉल्व्हमधून पाणीपुरवठा केला जातो. त्यातील एक व्हॉल्व्ह उघडा झाला आहे. त्यामुळे पुढील पाऊस होऊन पाणीसाठ्यात वाढ होईपर्यंत आठवड्यातून दर मंगळवारी शहरातील पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.