सातारा-पंढरपूर मार्गावर चौपदरीकरणातील धुरळ्यामुळे वाहनधारक हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 15:52 IST2018-01-30T15:48:06+5:302018-01-30T15:52:09+5:30
सातारा-पंढरपूर मार्गावर चौपदरीकरणाचे काम सुरू झाले असून, अनेकवेळा पाणी मारण्यात येत नसल्याने धुरळ्यातूनच वाहन घेऊन जावे लागत आहे. त्यामुळे वाहनधारक हैराण झाले आहेत. वाहतुकीच्या दृष्टीने या मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू झाले आहे.

सातारा-पंढरपूर मार्गावर चौपदरीकरणातील धुरळ्यामुळे वाहनधारक हैराण
सातारा : सातारा-पंढरपूर मार्गावर चौपदरीकरणाचे काम सुरू झाले असून, अनेकवेळा पाणी मारण्यात येत नसल्याने धुरळ्यातूनच वाहन घेऊन जावे लागत आहे. त्यामुळे वाहनधारक हैराण झाले आहेत.
सातारा-पंढरपूर हा मार्ग वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. या मार्गावर कोरेगाव, पुसेगाव, गोंदवले, म्हसवड अशी शहरे व गावे आहेत. तसेच धार्मिकस्थळे असल्याने या मार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. वाहतुकीच्या दृष्टीने या मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू झाले आहे.
सध्या हे काम खटाव तालुक्यात पुसेगावच्या पुढे दोन ठिकाणी सुरू आहे. त्याचबरोबर माण तालुक्यातही विविध ठिकाणी काम करण्यात येत आहे. त्यासाठी यंत्रणा मोठ्या प्रमाणात राबत आहे.
जेसीबी, पोकलेनच्या साह्याने काम करण्यात येत आहे. त्यासाठी मूळचा डांबरी रस्ता खोदण्यात येत आहे. बाजूची झाडे तोडून रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येऊ लागले आहे. काम सुरू असणाºया ठिकाणी वाहतूक वळविण्यात आली आहे. अशा कामामुळे धुरळा अधिक प्रमाणात उडत आहे. त्यामुळे अशा धुरळ्यातून वाहन नेणे जिकिरीचे होत आहे.
रस्त्याचे काम सुरू असताना पाणी मारणे आवश्यक असते. त्यामुळे धुरळा उडत नाही; पण या मार्गावर अनेकवेळा पाणी मारले जात नाही. परिणामी धुरळा मोठ्या प्रमाणात उडत आहे. हा धुरळा वाहनधारकांच्या डोळ्यात जात आहे. त्यामुळे डोळे चोळत दुचाकीधारकांना जावे लागत आहे.