सातारा : खंडाळा तालुक्यातील तोंडल गावच्या हद्दीत नीरा नदीमध्ये मच्छिमारांच्या जाळ्याचे नुकसान केल्याप्रकरणी विचारणा करायला गेलेल्या मच्छीमार महिलांना दमदाटी करण्यात आली. यामुळे आक्रमक झालेल्या महिलांनी मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. दमदाटी करणाऱ्यांकडून पोलीसांनी तलवार व चाकू जप्त केला आहे. महिलांचा रुद्रावतार पाहताच दमदाटी करणाऱ्या युवकांनी घटनास्थळावरुन पलायन केले.
घटनास्थळावरुन तलवार जप्तदरम्यान ,आज, मंगळवार, दि. १८ रोजी सकाळी तोंडल ता. खंडाळा गावच्या हद्दीत नीरा नदीमध्ये तोंडल येथील स्थानिक मच्छिमारांनी टाकलेल्या जाळ्या ठेकेदारांच्या व्यक्तींनी नदीमधून काढून फाडून टाकल्या. स्थानिक मच्छिमार महिला याबाबत विचारणा करायला गेल्या असता त्यांनाच संबंधितांनी दमदाटी केल्याचा आरोप करत महिलांनी रुद्रावतार धारण करत संबंधितांना चोप देत त्याठिकाणी असणाऱ्या केबिनची खुर्च्यांची, साहित्याची तोडफोड केली.
यावेळी महिलांचा रुद्रावतार पाहून संबंधित युवकांनी घटनास्थळावरुन पलायन केले. यावेळी घटनास्थळी आलेल्या शिरवळ पोलीसांनी घटनास्थळावरुन तलवार जप्त केला असल्याचा आरोप महिलांनी केला आहे. यावेळी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.