सातारा : ‘आॅक्टोबर हिट’बरोबरच खोल-खोल पाणी रांजणीत दुष्काळाचा ट्रेलर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 12:33 AM2018-10-31T00:33:19+5:302018-10-31T00:35:01+5:30

दुष्काळ विरोधातील लढ्यासाठी माण, खटाव तालुक्यांत यंदा चांगली कामे करण्यात आली; पण पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळाच्या झळा बसायला लागल्या आहेत.

Satara: Drought Trainer with 'Octa Hit' as well as Deep-Water Dwarf Trailer | सातारा : ‘आॅक्टोबर हिट’बरोबरच खोल-खोल पाणी रांजणीत दुष्काळाचा ट्रेलर

सातारा : ‘आॅक्टोबर हिट’बरोबरच खोल-खोल पाणी रांजणीत दुष्काळाचा ट्रेलर

Next
ठळक मुद्देतालुक्यातील अनेक गावांत पिण्याचे पाणी व चाऱ्याची भीषण टंचाई जाणवत आहे.शेतातील विहिरीतून पाणी आणून व काही नागरिक ५० रुपयांना एक बॅरल पाणी विकत घेऊन तहान भागवित होते

सातारा/म्हसवड : दुष्काळ विरोधातील लढ्यासाठी माण, खटाव तालुक्यांत यंदा चांगली कामे करण्यात आली; पण पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळाच्या झळा बसायला लागल्या आहेत. पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. प्रशासकीय यंत्रणा आता खडबडून जागी झाली असून, टंचाई आढावा बैठकांवर जोर दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पाणीटंचाईवर टाकलेला दृष्टीक्षेप.

माण तालुक्याला यंदा वळीव, मान्सून तसेच भरवशाचा परतीच्या पावसाने दगा दिला. त्यामुळे सर्वच ठिकाणचे जलस्त्रोत आटले. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांत पिण्याचे पाणी व चाऱ्याची भीषण टंचाई जाणवत आहे. पावसाचे सर्व नक्षत्र कोरडे गेल्याने तालुक्यातील पावसाच्या आशेवर खरिपाची केलेली पेरणी पूर्णत: वाया गेली. पाऊस नसल्याने रब्बी हंगामातही पेरणी न झाल्याने अन्नधान्याची व चाºयाची टंचाई निर्माण झाली आहे.

दुष्काळसदृश परिस्थितीचा सर्वाधिक सामना रांजणी ग्रामस्थांना करावा लागत आहे. सुमारे १,६६२ लोकसंख्येचे रांजणी ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची सोय ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात येते. ग्रामपंचायतीच्या विहिरीने तीन महिन्यांपासून तळ गाठल्याने गावचा पाणीपुरवठा तीन-चार महिन्यांपासून बंद झाला आहे. तेव्हापासून ग्रामस्थ शेतातील विहिरीतून पाणी आणून व काही नागरिक ५० रुपयांना एक बॅरल पाणी विकत घेऊन तहान भागवित होते; पण पंधरा दिवसांपासून तेही पाणी मिळणे बंद झाले.

सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे गावातील तरुणाई पोटापाण्यासाठी रंगकाम, गलाई उद्योग, इतर कामासाठी मुंबई, पुण्यात व अन्य ठिकाणी स्थलांतरित झाला आहे. दुष्काळी परिस्थिती ओढवल्याने मेंढरं जगविण्यासाठी त्यांना सध्या तालुका सोडून इतर ठिकाणी जाण्याशिवाय पर्यायच राहिला नाही.

टंचाई आढावा बैठक
पिंपोडे बुद्रुक : कोरेगाव तालुक्यातील उत्तरेकडील परिसरात सद्य:स्थितीत निर्माण झालेल्या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर वाघोली येथे बुधवार, दि. ३१ रोजी टंचाई आढावा बैठक आयोजित केली आहे, अशी माहिती जिल्हा परिषद सदस्य मंगेश धुमाळ यांनी दिली. कायम दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाºया तालुक्याच्या उत्तरेकडील परिसरात यावर्षी पावसाने दडी मारल्याने भीषण पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. पाण्याअभावी परिसरातील रब्बी हंगाम धोक्यात आला आहे. परिसरातील बहुतांशी गावांत पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना कैक संकटांचा सामना करावा लागत आहे. यावर उपाय शोधण्याच्या हेतूने या परिसरातील सर्व गावांची संयुक्त आढावा बैठक आमदार दीपक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर उपस्थित राहणार आहेत.

टँकर मागणीचा प्रस्ताव दाखल
रांजणीत पाण्याच्या टँकर मागणीचा प्रस्ताव शुक्रवार, दि. २६ आॅक्टोबरला माण पंचायत समितीमध्ये दिला आहे. टँकर लवकर सुरू होऊन नागरिकांची पाणी टंचाई दूर होईल, असा विश्वास ग्रामसेवक आर. बी. सुतार यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.

श्रमाला मिळेना निसर्गाची साथ
रांजणी गावाने दुष्काळी परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी यंदाच्या वर्षी सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धेत हिरीरीने सहभाग घेतला. रात्रंदिवस काम करुन त्यांनी कामे केली आहेत. यातून जलसंधारणाचे मोठं काम उभे केले .पण या श्रमाला निसगार्ची साथ न मिळाल्यामुळे पाणीटंचाईने उग्र स्वरुप धारण केले आहे. पाऊसच न झाल्याने सर्व भांडी कोरडी पडली आहेत. त्यामुळे रांजणी ग्रामस्थांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

माण तालुक्यातील रांजणी गावाला पाणी पुरवठा करणाºया विहिरीतील पाण्याने तळ गाठला आहे. त्यामुळे तीन महिन्यांपासून पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

रांजणीत माणसाला पाणी प्यायला नाही तर मुक्या जनवारांचं लय हाल हायती. घरची साठ मेंढरं जगवायची कशी, हा प्रश्नच आहे.
- सीताबाई कोकरे
पंच्चीस वर्षांतून पहिल्यांदाच दिवाळीपूर्वी दुष्काळ पडला आहे. आताच प्यायला पाणी नाही तर पिकाचा विषयच सोडा. पिकं नसल्याने जनावरांनी काय खायचं, असा प्रश्न बजरंग कोकरे यांनी उपस्थित केला.
- बजरंग कोकरे

 

Web Title: Satara: Drought Trainer with 'Octa Hit' as well as Deep-Water Dwarf Trailer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.