सातारा : कोयनेचे दरवाजे आता सात फुटांवर, नदीच्या पाणीपातळीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 13:22 IST2018-07-23T13:14:20+5:302018-07-23T13:22:44+5:30
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असून, कोयनेची पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचे दरवाजे सोमवारी सकाळी पुन्हा एक फुटाने उचलून सात फुटांवर नेण्यात आले आहेत.

सातारा : कोयनेचे दरवाजे आता सात फुटांवर, नदीच्या पाणीपातळीत वाढ
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असून, कोयनेची पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचे दरवाजे सोमवारी सकाळी पुन्हा एक फुटाने उचलून सात फुटांवर नेण्यात आले आहेत.
त्यामुळे सहा दरवाजे आणि पायथा वीजगृहातून ३२८०९ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. परिणामी नदीच्या पाणीपातळी वाढ झाली आहे. तर दुसरीकडे पूर्व दुष्काळी भागात पावसाची दडी कायम आहे.
गेल्या २२ दिवसांपासून जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस पडू लागला आहे. या पावसाचा जोर कमी झाला असलातरी धरणात पाणीसाठा वाढू लागला आहे. कोयना, कण्हेर, तारळी यासह मोठ्या धरणात पाण्याची मोठी आवक होत आहे.
कोयना धरण परिसरात पाऊस सुरू असल्याने शनिवारी धरणाचे सहा दरवाजे पाच फुटांपर्यंत उचलण्यात आले होते. रविवारी दुपारी बाराला दरवाजे सहा फुटांपर्यंत उचलण्यात आले. तर सोमवारी सकाळी अकराला धरणाचे दरवाजे आणखी एका फुटाने उचलण्यात आले.
सध्या धरणाचे सहा दरवाजे सात फुटांवर असून, त्यातून ३०७०९ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तर पायथा वीजगृहातूनही २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. धरणाच्या दरवाजातून विसर्ग वाढल्याने कोयना नदीची पाणीपातळी वाढ झाली आहे. आणखी विसर्ग वाढल्यास नदीला पूरपरिस्थती निर्माण होणार आहे. तर धरणात ८४.२४ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे.
जिल्ह्यातील धोम वगळता इतर धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. कण्हेरमध्ये सोमवारी सकाळी ८.५८ टीएमसी साठा होता. धरणातून ३४९१ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. बलकवडी धरणातही ३.४८ टीएमसी पाणीसाठा असून, १२०३ क्युसेक पाण्याचा विसर्ग आहे.
तारळीतील साठा ५.११ टीएमसी असून, २५८१ क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नीरा देवघर धरण परिसरात २६ मिलीमीटर पाऊस झाला असून, साठा ९.३० टीएमसी आहे. वीर धरणात ९.५६ टीएमसी पाणीसाठा असून, १३३६२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
धरणक्षेत्रातील २४ तासांतील व एकूण पाऊस मिलीमीटरमध्ये
धोम ०३ (४७९)
कोयना ५१ (३२५८)
बलकवडी २९ (१७५७)
कण्हेर ०२ (५६४)
उरमोडी १२ (८४६)
तारळी २१ (१५५२)