सातारा : मुख्यमंत्री फडणवीस रतन खत्रीकडे कामाला होते का? : राज ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 16:37 IST2018-02-01T16:34:21+5:302018-02-01T16:37:31+5:30
‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रोज एक नवा आकडा सांगतात. सत्यता नसतानाही ते आकडे सांगण्यात माहिर आहेत. मला वाटतं ते रतन खत्रीकडे कामाला होते का? रोज एक नवा आकडा? ते म्हणतात राज्यात ३६ हजार विहिरी बांधल्या, मला वाटतं रस्त्यावर पडलेले खड्डेही ते विहिरींच्या आकडेवारीत धरत असतील,’ अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे यांनी केली.

सातारा : मुख्यमंत्री फडणवीस रतन खत्रीकडे कामाला होते का? : राज ठाकरे
सातारा : ‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रोज एक नवा आकडा सांगतात. सत्यता नसतानाही ते आकडे सांगण्यात माहिर आहेत. मला वाटतं ते रतन खत्रीकडे कामाला होते का? रोज एक नवा आकडा? ते म्हणतात राज्यात ३६ हजार विहिरी बांधल्या, मला वाटतं रस्त्यावर पडलेले खड्डेही ते विहिरींच्या आकडेवारीत धरत असतील,’ अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे यांनी केली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी झालेल्या भाषणात राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावरही शरसंधान साधले. मोदी यांचा उल्लेख अनेकदा त्यांनी गुजरातचे पंतप्रधान असा केला. नितीन गडकरींना तर मोठ्या आकड्यांचा बागूलबुवा उभा करण्याचे आवडंत असल्याचे त्यांनी म्हटले.
राज ठाकरे म्हणाले, ‘रोजच्या रोज येऊन तुमच्याशी थापा मारतायत, केंद्र व राज्यातलं सरकार केवळ थापाड्यांचं. सतत तुमच्याशी खोटं बोलत राहणे, एवढाचा एकमेव कार्यक्रम सुरू आहे. त्या दिवशी गुजरातचे पंतप्रधान स्वित्झर्लंडला गेले होते. तेव्हा निवडणुकीत त्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार १५ लाख तुमच्या खात्यावर येतील, असा मेसेज तेव्हा फिरत होता. त्यावर कहर म्हणजे दोन थापा मारल्या म्हणून काय होते, असंही म्हणणारे भाजपमध्ये काही मंडळी आहेत.
१९८४ मध्ये राजीव गांधींना बहुमत मिळालं होतं. त्यानंतर ३० वर्षांनी नरेंद्र मोदींना बहुमत मिळालं. त्याचं सार्थक त्यांना करता आलेलं नाही. एवढ्या मोठ्या देशात असं बहुमत मिळवणंही सोपं नाही.’ मुख्यमंत्र्यांवर टीका करताना ते म्हणाले, ‘मुख्यमंत्री रोेज नवा आकडा काढतात. फेकाफेकी सारी. लिहून दाखवा म्हटलं तर त्यांना ते जमेल काय?
नितीन गडकरींना तर थापा मारायची आवडच आहे. ३० कोटींचा प्रकल्प उभा करणार, असं ते म्हणाले, सांगा आहेत का पैसे? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, महाराष्ट्रात ३६ हजार विहिरी बांधल्या. एका विहिरीला ५ लाख रुपये खर्च पकडला तर ५ लाख गुणिले ३६ हजार काढा किती आकडा होतो ते, काहीही थापा मारतात आणि लोकं टाळ्या वाजवून मोकळे होतात.’