सातारा : धोकादायक वळणाला मिररचा आधार.., अपघाताचे प्रमाण घटले ; नागरिकांमधून समाधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 18:41 IST2018-02-27T18:41:14+5:302018-02-27T18:41:14+5:30
सातारा येथील समर्थ मंदिर परिसरातील टोपेमामा चौकामध्ये धोकादायक वळणावर बसविण्यात आलेल्या मिररमुळे अपघाताचे प्रमाणही कमी झाले असून, यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

सातारा : धोकादायक वळणाला मिररचा आधार.., अपघाताचे प्रमाण घटले ; नागरिकांमधून समाधान
सातारा : येथील समर्थ मंदिर परिसरातील टोपेमामा चौकामध्ये धोकादायक वळणावर बसविण्यात आलेल्या मिररमुळे अपघाताचे प्रमाणही कमी झाले असून, यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
समर्थ मंदिर परिसरातील गोविंदनगरी अपार्टमेंटशेजारी टोपेमामा मंदिर असून या ठिकाणी चौक आहे. आजूबाजूला इमारती आणि जुनी घरे असल्यामुळे राजवाड्याहून आलेल्या वाहन चालकांना पोवईनाक्यावरून आलेली वाहने दिसत नव्हती. त्यामुळे या चौकात सतत अपघात होत होते.
गेल्या काही दिवसांपूर्वी एका शाळकरी मुलाला याच चौकात कारने धडक दिली होती. मात्र, सुदैवाने त्या मुलाला फारशी जखम झाली नाही. या चौकामध्ये वारंवार अपघात होत असल्याने काही नागरिकांनी या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी केली होती. परंतु, फार पूर्वीपासून या ठिकाणी लोकांचे वास्तव्य असल्याने आणि लोकांना पर्यायी जागा नसल्याने रुंदीकरणाला अडथळे येत असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.
राजवाड्याहून समर्थ मंदिरकडे जाताना तीव्र चढ आहे. या चढावर वाहनांचा वेग बऱ्यापैकी असतो. त्यामुळे पोवईनाक्यावरून आलेले वाहन राजवाड्याहून येणाऱ्या चालकाला दिसत नव्हते. त्यामुळे हमखास या ठिकाणी दिवसातून एकदा तरी अपघात होत होता. त्यामुळे या परिसरात राहाणाऱ्या नागरिकांनी एकत्र येऊन पाच हजार रुपये किमतीचा मिरर त्या ठिकाणी बसविला.
गेल्या तीन दिवसांपासून या ठिकाणी हा मिरर बसविल्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण अक्षरश: घटले आहे. वाहन चालकांना दुसऱ्या बाजुंनी आलेली वाहने त्या आरशामध्ये दिसत असल्यामुळे हा चौक आता सुरक्षित झाला आहे.