सातारा : कोरोना संसर्गित रुग्ण संख्येमुळे सातारा जिल्ह्याची धोक्याकडे वाटचाल सुरू झाली आहे. आठ दिवसांमध्ये जिल्ह्यात तब्बल नऊ हजार ९७४ नवीन रुग्ण आढळून आले. त्यामुळे सक्रिय रुग्णसंख्या सोमवारी दुपारी १३ हजार ८५२ झाली. या संख्येमुळे सातारा जिल्हा राज्यात सक्रिय रुग्णसंख्येत ''टॉप टेन''च्या उंबरठ्यावर आहे. १२ ते १९ एप्रिल या कालावधीत १८२ जणांचा मृत्यू झाला. यामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २१५३ झाली आहे.
जिल्ह्यात एप्रिल महिन्यात कोरोना बाधित रुग्णसंख्या दररोज सरासरी एक हजाराच्या घरात वाढत आहे. आतापर्यंतच्या रुग्णसंख्या वाढीचे विक्रम दररोज मोडले जात आहेत. सातारकर मात्र अजूनही शहरांमधून बिनधास्त फिरत आहेत. जिल्हा प्रशासनाला नागरिकांचा अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याने कोरोनाची साखळी कशी तोडायची, हा अवघड प्रश्न बनला आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढली असून, यातून जिल्ह्याला सावरण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला खासदार, आमदार, जिल्हा परिषद पदाधिकारी आदी बहुसंख्य लोकप्रतिनिधींनी संकट काळात घरात कोंडून घेणे पसंत केल्याचे दिसत आहे.
कोरोना बाधित रुग्णांसाठी बेड वेळेवर उपलब्ध होत नाही. बेड मिळाला तर ऑक्सिजन, व्हेंटिलेटर मिळेलच, याची खात्री नाही. रेमडेसिविर इंजेक्शनसाठी नातेवाइकांना परजिल्ह्यात जाऊन धावाधाव करावी लागत आहे. यामुळे रुग्ण आणि नातेवाईक यांचा जीव टांगणीला लागला आहे. साताऱ्यात रविवारी केवळ ऑक्सिजन बेड उपलब्ध न झाल्याने एका वृद्धाला जीव गमवावा लागला. या घटनेमुळे कोरोनाने कोणती पातळी गाठली आहे, याची कल्पनाच न केलेली बरी. आतातरी लोकप्रतिनिधींनी जागे होऊन सर्वसामान्यांना आरोग्य सेवा कशी उपलब्ध होईल, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
चौकट
लोकप्रतिनिधी अज्ञातवासात
कोरोनाचा उद्रेक होत असताना लोकप्रतिनिधी मात्र अज्ञातवासात गेले आहेत. जिल्ह्याला दोन मंत्री मिळाले असले तरी बेडअभावी रुग्णाला जीव गमवावा लागतो. आमदार, खासदार कोठेही मदत कार्यात सक्रिय असल्याचे दिसत नाहीत. रुग्णालय उभारावे, अत्यावश्यक आरोग्य सुविधा पुरवाव्यात, असे एकाही लोकप्रतिनिधींना वाटत नाही. गृह विलगीकरनातील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना बाहेर पडावेच लागणार नाही, यासाठी आवश्यक बाबी पुरवण्याचे काम राजकीय कार्यकर्त्यांनी केले तरी शहरातील गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे बाधितांची संख्या नियंत्रणात येऊ शकते.
दहाव्या क्रमांकावर
राज्यात रविवारी जळगाव जिल्ह्यात १२ हजार ७९५ सक्रिय रुग्ण होते. त्यामुळे जळगाव जिल्हा दहाव्या क्रमांकावर होता. तर सातारा जिल्ह्यात रविवारी तेरा हजार ७६ रुग्णांवर उपचार सुरू होते. तो सोमवारी दुपारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात १३ हजार १५२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामुळे जिल्ह्याचा राज्यात टॉप टेनमध्ये समावेश झाला आहे.