सातारा : ऐन दिवाळीत खर्डा-भाकर खाऊन शासनाचा निषेध, पुसेसावळीत रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 17:28 IST2018-11-06T17:24:16+5:302018-11-06T17:28:21+5:30
खटाव तालुक्याचा दुष्काळी तालुका म्हणून घोषित व्हावा, यासाठी पुसेसावळीसह परिसरातील शेतकऱ्यांनी मंगळवारी सकाळी साडेवाजता वाजता येथील दत्तचौकामध्ये रास्तारोको आंदोलन केले.

सातारा : ऐन दिवाळीत खर्डा-भाकर खाऊन शासनाचा निषेध, पुसेसावळीत रास्ता रोको
पुसेसावळी : खटाव तालुक्याचा दुष्काळी तालुका म्हणून घोषित व्हावा, यासाठी पुसेसावळीसह परिसरातील शेतकऱ्यांनी मंगळवारी सकाळी साडेवाजता वाजता येथील दत्तचौकामध्ये रास्तारोको आंदोलन केले.
हे आंदोलन सुमारे एक तास सुरु होते, यावेळी पुसेसावळी, राजाचे कुर्ले, पारगाव, चोराडे गोरेगाव, वडगाव, कळंबी, वडी, लाडेगाव, उंचीठाणे, रहाटणी यासह परिसरातील शेतकरी वर्ग उपस्थित होते. तसेच आंदोलनावेळी शेतकऱ्यांबरोबर अधिकाऱ्यांनीही खर्डा-भाकरी खाऊन दिवाळी साजरी केली.
यावेळी शासनाच्याविरोधात घोषणा देत खटाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आंदोलकांनी केली. शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी तालुक्यांच्या यादीत खटाव तालुक्याचा समावेश न केल्यामुळे शेतकरी जनतेमध्ये संतापाचे वातावरण आहे.
या पार्श्वभूमीवर आंदोलनाची भूमिका घेण्यात येणार होती मात्र महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन दुष्काळी यादीत खटाव तालुक्याचा समावेश करण्याचे आश्वासन दिले होते.
शासनाने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत देखील खटावचा समावेश न झाल्यामुळे हुतात्म्यांच्या भूमीची चेष्टा केली गेली आहे. त्यामुळे सुस्त प्रशासनाला जाग आणण्यासाठी शांततेच्या व लोकशाही मार्गाने रास्ता रोको आंदोलन
करण्यात आले. यावेळी आंदोलन स्थळी आलेले वडूजचे नायब तहसीलदार सुधाकर धायिजे यांना शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
यावेळी गावोगावचे राजकीय, सामाजिक शेतकरी संघटना आदी क्षेत्रातील नेते, कार्यकर्ते, शेतकरी वर्ग उपस्थित होते. या आंदोलनांवेळी औंध पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरिक्षक सुनील जाधव व कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
जोपर्यंत दुष्काळ जाहीर होत नाही, तोपर्यंत या भागात मंत्र्यांना फिरु देणार नाही. दुष्काळ जाहीर न झाल्यास येणाऱ्या निवडणुकांत बहिष्कार टाकावा, लोकप्रतिनिधिंनी शेतकऱ्यांच्या मुलभूत सुविधांकडे लक्ष दयावे.
- सचिन नलवडे,
जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना
प्रशासन व पदाधिकारी यांनी आणेवारी देताना लक्ष देण्याची गरज होती; परंतु याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. तरी शासनाने फेरसर्वेक्षण करुन तालुक्याचा दुष्काळी यादीमध्ये सामावेश करावा, अन्यथा
जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल.
- मानसिंगराव माळवे,
माजी समाजकल्याण सभापती जिल्हा परिषद, सातारा