सातारा : दुष्काळाची घोषणा; पण मदत कधी..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 16:00 IST2018-11-01T15:57:39+5:302018-11-01T16:00:33+5:30
राज्य सरकारने ३१ आॅक्टोबरचा मुहूर्त साधत दुष्काळ जाहीर केला असून, त्यानुसार माणमध्ये गंभीर तर फलटण आणि कोरेगाव या तालुक्यांत मध्यम स्वरुपाच्या दुष्काळाची स्थिती आहे. सरकारने हा दुष्काळ जाहीर करून सोपस्कार पार पाडले असलेतरी शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार? हाही प्रश्न आहे.

सातारा : दुष्काळाची घोषणा; पण मदत कधी..!
सातारा : राज्य सरकारने ३१ आॅक्टोबरचा मुहूर्त साधत दुष्काळ जाहीर केला असून, त्यानुसार माणमध्ये गंभीर तर फलटण आणि कोरेगाव या तालुक्यांत मध्यम स्वरुपाच्या दुष्काळाची स्थिती आहे.
सरकारने हा दुष्काळ जाहीर करून सोपस्कार पार पाडले असलेतरी शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार? हाही प्रश्न आहे. कारण जनावरांच्या चाऱ्यांची सोय करण्यातच शेतकऱ्यांचा दिवस जात आहे. तर पाण्याबाबतही परवड सुरू झाली आहे. त्यातच खटाव तालुक्याचा दुष्काळात समावेश नसल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
माण तालुक्यात दुष्काळी स्थिती आतापासूनच भयानक बनली आहे. शेतकऱ्यांच्या पदरी खरीप हंगाम पडला नाह, त्यामुळे चाऱ्याचा प्रश्न भेडसावत आहे. पावसाअभावी विहिरींनी तळ गाठला आहे. मोटारीने पाणी काढावे एवढेही पाणी विहिरीच्या तळाशी नाही, अशी अनेक गावांत स्थिती आहे.
चारा विकत घ्यावा तर त्यालाही हजारो रुपये मोजावे लागत आहेत. जनावरांच्या चारा आणि पाण्याची सोय करण्यातच शेतकऱ्यांचा दिवस खर्ची पडत आहे. खटाव तालुका, कोरेगाव तालुक्यांचा उत्तर भाग आणि फलटण तालुक्यातही भीषण स्थिती निर्माण होणार आहे.